गिरीश महाजन म्हणजे कर्तव्यशून्य अन् देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला माणूस

जळगाव : गिरीश महाजन यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देतांना एकनाथ खडसे यांनी महाजन यांना कर्तव्यशून्य माणूस असे संबोधूून देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला माणूस आहे, अशी बोचरी टिका केली आहे.
‘मी काय काम केले असे प्रश्न विचारणाऱ्यांनी पाटबंधारे मंत्री असतांना काय दिवे लावले ?’ असा सवाल उपस्थित करत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजनांवर तोफ डागली. तुमच्या मतदारसंघातील शंभर टक्के धरण नाथाभाऊंच्या कालखंडात झाले आहे असे सांगत गिरीश महाजन कर्तव्यशून्य माणूस आहे. त्यामुळे त्यांना भाव देण्यासारखे नाही असा संताप व्यक्त करतांना त्यांनी महाजनांवर आगपाखड केली.
मंत्री गिरीश महाजन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ खडसेंवर गंभीर आरोप केले. भोसरी भूखंड खरेदी करतांना एकनाथ खडसेंनी गैरव्यवहार केल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केला होता. तर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आव्हान देत मला पाडायचे असेल तर जामनेरला मुक्कामी राहा आणि मला पडून दाखवा असे त्यांनी म्हटले होते.
यानंतर खडसेंनी महजनांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. खडसे म्हणाले की, गिरीश महाजन हा देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला माणूस आहे. महाजनांचे स्वतःचे कतृत्व शून्य आहे. त्यामुळे त्यांना भाव देण्यासारखे महत्त्व नाही असा संताप त्यांनी व्यक्त केला.
खडसे म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचल्या गेले होते. त्याचा प्रमुख सूत्रधार कोण आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणतात की, भोसरीत खडसेंनी भूखंड घेतला. आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. मी महसूलमंत्री असताना तेवढी अक्कल मला होती. गिरीश महाजनांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची दिली आहे, असा पलटवार त्यांनी यावेळी केला.