त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या… मोकाट आरोपीची कुटूंबियांना धमकी ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’
राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणारी घटना

छत्रपती संभाजीनगर : राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना सध्या राज्यात घडत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ओहर गावात काही दिवसांपूर्वी मुलांच्या त्रासाला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली होती. या प्रकरणातील काही आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांना जाहीरपणे धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे.
१८ ऑगस्ट रोजी ओहर गावात मेकॅनिक असलेल्या कासिम यासीन पठाण या तरुणाच्या धमक्यांना कंटाळून पूजा शिवराज पवार हिने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले होते. मात्र, याप्रकरणातील उर्वरित मोकाट आरोपी हे पूजा पवार हिच्या कुटुंबीयांना धमकावत असल्याचा व्हीडिओ समोर आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणात ७ जणांवर गुन्हा नोंदवला होता, पण केवळ दोघांनाच अटक करण्यात आली होती. मोकाट असलेल्या उर्वरित आरोपींनी आता पूजाच्या कुटुंबीयांना धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तिच्या घरासमोर येऊन कुटुंबीयांना चाकू आणि तलवारी दाखवून धमकावले. या आरोपींना कायद्याचा जराही धाक उरलेला नाही. यापैकी एकजण जाहीरपणे म्हणत होता की, ‘आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल’. याचा अर्थ पोलिसांनी आपल्याला पकडले तरी काही दिवसांत जामीन घेऊन बाहेर येऊ, असा तगडा आत्मविश्वास या आरोपींना आहे. त्यामुळे राज्यातील गुन्हेगारांना पोलिसांचा वचक उरला आहे की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकारामुळे पवार कुटुंबीय दहशतीखाली आहेत. आज या प्रकरणात उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल टी पॉइंटवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.