प्रियसीचा लग्नास नकार; युवकाची आत्महत्या
सांगोला : प्रतिनिधी :-
माझे एका मुलीवर प्रेम आहे ,ती मला लग्नाला नकार देत आहे, माझी जगण्याची इच्छा संपली आहे, असे फोनवर बोलून जेसीपी चालकाने कटफळ ता. सांगोला येथील फॉरेस्टमध्ये झाडास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी दिनांक १७ डिसेंबर रोजी गणेश फाटे रा. गार्डी ता. पंढरपूर यांनी सांगोला पोलीसात खबर दिली असून, संजय भगवान केदार (वय २५) रा. लातुर जि. लातुर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांच्याकडे एक जेसीपी मशीन असून, त्यावरती ऑपरेटर म्हणून संजय केदार हा गेल्या सहा महिन्यापासून कामास होता. फिर्यादी यांची दुचाकी दैनंदिन कामकाजाकरिता संजय केदार यांच्याकडे होती.
दिनांक १७ डिसेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संजय केदार याने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, माझे एका मुलीवर प्रेम आहे, ती मला लग्नाला नकार देत आहे, माझी जगण्याची इच्छा संपली आहे, असे म्हणून फोन ठेवला.
त्यानंतर त्याने फिर्यादी यांना व्हाट्सपवर करंट लोकेशन पाठविले. फिर्यादी व मित्र ज्ञानेश्वर वाघमारे असे संजय याला शोधत सदर लोकेशनवर गेले. तेव्हा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास कटफळ येथील दुधाळवाडी येथे फॉरेस्ट नजीक फिर्यादी यांची मोटारसायकल एका ठिकाणी लावलेली दिसली.
मोटारसायकलच्या आजुबाजूस संजयचा शोध घेतला असता, फॉरेस्टमध्ये पाझर तलावमध्ये असलेल्या एका पळसाच्या झाडास दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत संजय केदार हा दिसून आला, असे पोलीसात दिलेल्या खबरीत म्हंटले आहे.