नाशिकमध्ये तुरुंगातून सुटलेल्या गुंडाची रॉयल मिरवणूक, बॉस इज बॅकच्या घोषणा

नाशिक: नाशिकमध्ये गुन्हेगारांच्या उदात्तीकरण एक उदाहरण समोर आले आहे. नुकतेच हर्षद पाटणकर या गुंडाला तुरुंगातून सोडण्यात आले. त्यानंतर गुंडाच्या समर्थकांनी त्याची शहरात जोरदार मिरवणूक काढली. ही मिरवणूक म्हणजे एकप्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान असल्याचे आता बोलले जात आहे.
एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर शरणपूर रोड परिसरात पाटणकरच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरांचाही सहभाग होता. या मिरवणुकीत चारचाकी व 10 ते 15 बाईकचा सहभागी होत्या. शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली. या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ही मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर परिसर दणाणून गेला होता. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेले समर्थक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. तसेच बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या जात होत्या. त्यानंतर समर्थकांनी सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड असून हे व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश शिंदे यांनी जुलै महिन्यात नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झोपडपट्टीदादाविरोधी कलमान्वये (एमपीडी) हर्षद पाटणकरवर कारवाई झाली होती. त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.