वर्दीतील शांत, संयमी व ‘हसमुख’ व्यक्तिमत्त्व हनुमंत माळकोटगी यांची पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती

सांगोला : प्रतिनिधी
सांगोला पोलीस स्टेशनमध्ये गोपनीय विभागात अनेक वर्षे कार्यरत असणारे हनुमंत माळकोटगी (पोलीस उपनिरीक्षक) यांची आज दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती आहे. त्यानिमित्ताने हा छोटा ‘शब्दप्रपंच’ म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्व व आदर्श माणूसचा शब्दबद्ध सन्मान सोहळाच.
गाव जत तालुक्यातील उडगी गावात जन्म असलेले हनुमंत माळकोटगी, साहजिकच मराठी बोलण्यावर कन्नड शब्दउच्चारांचा साज असणारे संभाषण. पोलीस खात्यातील ‘हृदय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोपनीय विभाग आल्यानंतर त्यांनी हळूहळू आपल्या स्वभाव गुणांमुळे तालुक्यातील प्रत्येक लोकांशी गोड बोलून लोकांच्या ‘हृदयात’ आपले आदरणीय स्थान निर्माण केले.
स्वभाव शांत असले तरी पोलीस खात्याविषयी असणारी त्यांची आत्मीयता नेहमी सगळ्यात वेगळी आणि अधिक प्रामाणिक वाटते. पोलीस खात्यातील नोकरी म्हणजे अनेकांना आकाश ठेंगणे वाटते, पण माळकोटगी यांनी मात्र कायमस्वरूपी पाय जमिनीवर ठेवून पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या प्रत्येकाशी अधिक समजूतदार म्हणून प्रेमाने मृद भाषेने नाते जोडले.
अत्यंत बिकट परिस्थितीत नोकरी मिळाली, त्यामुळे गरिबीची जाणीव आणि नैतिकता पाळून नेहमी पोलीस खात्यात आजवर काम केले. अगदी पहाटे सांगोला शहरातील विविध भागात दुचाकीवर फेरफटका मारणे आणि गोपनीय विभागाचे काम करताना आलेल्या प्रत्येकांच्या मनाचा ठाव घेण्याची कला नक्कीची कौतुकास्पद आहे.
सांगोला तालुक्यातील प्रत्येक मोर्चे, आंदोलन असले की, माळकोटगी अण्णा ‘त्या’ आंदोलनकर्त्याच्या अगोदरच आपली हजेरी लावत. कितीही गोंधळ असलातरी शांतपणे परिस्थिती हाताळत. निवडणुकांमुळे कितीही वातावरण तापले तरी त्यांनी मोठ्या परिश्रमाने अगदी शांततेत लोकांशी संपर्क ठेवून कामगिरी केली.
रागाने आलेला किंवा पूर्वानुभवानुसार पोलीस बांधवांविषयी पूर्वग्रहदूषित पणाने येणाऱ्याचे अगदी गोडबोलून ‘इकडे ऐका सरजी, तस नाही ते’ असे म्हणून लहान- मोठ्यांचे मनपरिवर्तन करणारे हसमुख व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची आगळीवेगळी झकल नेहमी पहावयास मिळाली.
हनुमंत या नावाप्रमाणेच प्रमाणे कधी सर्वसामान्य लोकांसाठी तर कधी पोलिसांसाठी संकटमोचण तर कधी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसाठी कठोर भूमिका घेणारे, नेहमीच सर्वांसाठी आदरणीय राहिले.
पोलीस खात्यातील त्यांचा अनुभव आणि माणुस पारखण्याची कला अलीकडे नव्याने पोलीस भरती झालेल्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. पोलीस म्हणून काम करताना जोश आणि होश यांचा समतोल राखून काम करावे असेच नेहमी त्यांच्या बोलण्यातून दिसून येत असे. त्यांच्या राहिणीमान आणि बोलण्यातून कधीचं ‘मी पोलीस’ असल्याचा गर्व दिसला नाही, नेहमी दिसला तो शांत, संयमी स्वभाव आणि कर्तव्यनिष्ठा पोलीस. सांगोला पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या व कामास असलेल्या महिलांविषयी त्यांचा आदरभाव नक्कीच त्यांच्या बोलण्यातून व स्वभावतून दिसून आला.
गोपनीय विभागातील त्यांची कारकीर्द नक्कीच सांगोल्यातील लोकांच्या लक्षात राहील. प्रत्येक वेळा वाद न घालता नेहमी संवाद करून कामावर त्यांचा भर असे.
आज जरी त्यांची पोलीस खात्यातील सेवानिवृत्ती असली तरी, यानंतरच्या काळातही लोकांच्या मनपरिवर्तन सेवेचा वसा असाच पवित्र गंगा नदी प्रमाणे वाहत राहील, त्यांच्या सानिध्यात असणारी माणसं त्यांच्या सदविचार आणि सद्’गुणांमध्ये ‘कुंभस्नान’ करतील हे मात्र नक्की.