जत्रा भरवण सोपं असतं पण निवडणूक लढणे अवघड; जरांगेंच्या निर्णयावर हाकेंची तिखट प्रतिक्रिया
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विधानसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीररित्या सांगितले आहे. जरांगे यांच्या या निर्णयानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘जे उमेदवार देणार आहेत, तेथील उमेदवार त्यांना येऊन भेटले आहेत. म्हणून त्या मतदारसंघांची नावं घेऊन मोकळे झाले आहेत. मला वाटतं तिथं देखील उमेदवार मिळणार नाही आणि मिळाले तर एकदम तकलादू असतील. कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी निवडून आणण्यासाठी बारामतीच्या सांगण्यावरुन उमेदवार दिले असतील. त्यांच्या या उमेदवारांमध्ये काही ताकद नाही. बारामती स्क्रिप्टनुसार ते वागत आहे.”
“जत्रा भरवण सोपं असतं पण निवडणूक लढण अवघड असत. जरांगे नावाचे वटवाघूळ स्वत:च्या औकातीवर आले. लोकसभेला बारामती सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला. आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली आहे. राणांना लढायला वाघाचं काळीज लागतं गनिमी काव्याचा काळ गेला. दिवसाला भूमिका बदलणारा हा माणूस आहे. मुंबईला मोर्चा घेऊन गेले आणि मुंबईच्या वेशीवरून ते माघारी आले. जरांगे नावाच्या माणसाला संविधान, लोकशाही आणि निवडणुकीचा अभ्यास नाही,” असा हल्लाबोल जरांगे यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी केला.
“माझ्या ६०-७० सभा महायुतीच्या विरोधात झाल्या आहेत. त्यामुळे मी महायुतीचा आहे, असं म्हणू शकत नाही. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलेल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. ओबीसीचा समाजाचा वापर करून निवडून आले. आमचे पण काही ओबीसी उमेदवार आहे. अनेक ठिकाणचे उमेदवार निवडून येणार आहे. मराठवाड्यातील ७-८ जिल्ह्यातील कामं आम्ही करत आहोत. ओबीसी ७० जागा लढणार काही ३०-३५ ठिकाणी आम्ही पाठिंबा देणार आहोत. शरद पवार यांच्या उमेदवाराला पाठींबा असेल पण त्यांना ओबीसीबाबत भूमिका घेणार असेल त्यांना पाठिंबा देणार आणि विरोधात असेल त्याचा विरोध असेल. जो माणूस ओबीसी आरक्षणाच्या बाजूने असेल त्यांना आमचा पाठींबा असेल,” असे लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे यांनी एका जातीवर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. उमेदवार द्यायचा नाही, आता कोणाला पाडायचे ते पाडा आणि कोणाला आणायचे ते आणा, असे आवाहन केले आहे.