घरगडी ते अब्जाधीश… वाल्मिक कराडची काय आहे संपत्ती

सोलापूर: बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराडच्या अनेक ठिकाणी मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी वाल्मिक कराडसह त्याच्या दोन्ही पत्नीच्या नावे मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बीडसह पुणे, पिंपरी चिंचवडनंतर आता सोलापुरात देखील वाल्मिक कराडची मालमत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचं समोर आलं आहे.
वाल्मिक कराडने ज्योती जाधवच्या नावे पुण्यातील महागड्या फर्ग्युसन रस्त्यावर अलिशान ऑफिस खरेदी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे एक घरगडी ते हजारो संपत्ती, करोडोंचा मालक वाल्मिक कराडवर लवकरच ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण फर्ग्युसन रस्त्यावर वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचे २५ कोटी किमतीचे ऑफिसेस असल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, आरोपांनुसार वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव आणि विष्णु चाटेच्या नावे २५ कोटी किमतीचे ऑफिसेस खरेदीचा व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वाल्मिक कराड फरार असताना ज्योती जाधवची चौकशी पोलिसांनी केली होती. इतकंच नाहीतर पुण्यातील मगरपट्टा भागात एका फ्लॅटची किंमत १५ कोटी रूपये आहे, त्या टॉवरमध्ये सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांनुसार, ७५ कोटींचा एक फ्लोअर वाल्मिक कराडने आपल्या ड्रायव्हरच्या नावे खरेदी केला आहे. माजलगाव येथे सुदाम नरोडे यांच्या नावे ५० एकर जमीन, ज्योती जाधव यांच्यानावे बार्शीत ५० एकर जमीन यासह कराडने किती माया जमवली.
बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योती मंगल जाधव हिच्या नावाने 4 जमिनीचे सातबारे असल्याचे ट्विट सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी केले होते. ज्योती मंगल जाधवच्या नावावर पुण्यात देखील कोट्यावधी रुपयांची संपत्ती खरेदी करण्यात आली आहे. बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्याच्या कालावधीत ह्या चार ही जमिनी खरेदी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. या आधी ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं. त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत देखील कोट्यावधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे, त्याचबरोबर पुण्यातील एफसी रोड याठिकाणी ज्योती जाधवच्या नावे दोन ऑफीस स्पेस घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे.
कोणत्या ठिकाणी मालमत्ता?
1) पिंपरी चिंचवडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीत जून 2021 मध्ये फोर बीएचके फ्लॅट खरेदी करण्यात आला.
2) पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे.
3) पुण्याच्या फर्ग्युसन रोडवर वाल्मिक कराड आणि टोळीने 25 कोटी रुपये खर्चून सहा ऑफिस स्पेसेस विकत घेतल्याचा दावा आहे.
4) बार्शीतल्या शेंद्री गावात एकूण चार शेतजमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचे क्षेत्रफळ साधारण 35 एकर इतके आहे, तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती समोर आली आहे.
5) ज्योती मंगल जाधवच्या नावे पुण्यातील हडपसर मधील अॅमेनोरा पार्क टाऊनशीप मधे Sector R 21, Tower 33, floor 17, फ्लॅट 07 हा फ्लॅट Sector R 21 , Tower 33 , फ्लॅट 08 हा आणखी एक फ्लॅट Gera Greensville, फ्लॅट नंबर A 3 , खराडी हा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलं आहे. या फ्लॅटची किंमत दीड ते तीन कोटींच्या आसपास आहे.