छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंग : … मी त्यांचा विचार कसा करु, माझ्या भावाला व वडिलांना फाशी द्या; पतीच्या मृत्यूनंतर विद्याने फोडला टाहो
छत्रपती संभाजीनगर : मुलीसोबत आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरा अन् चुलत साल्याने जावयाला भररस्त्यावर चाकूने भोसकले. पोट, मांडीत जीवघेणे वार केले. ही घटना १४ जुलैला रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास इंदिरानगर, गारखेडा भागात घडली होती. उपचारादरम्यान तरुणाचा २५ जुलैला तरुणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तर, मुलगी विद्यानेही वडिल व भावाच्या विरोधात भूमिका घेत पतीसाठी न्यायाची मागणी केली आहे. त्यांनी माझा विचार केला नाही, मी त्यांचा विचार कसा करु, असे म्हणत तिने भावाला व वडिलांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
विद्या म्हणाली, माझा संसार सुरू झाला होता. त्यांनी तो विचार केला नाही. माझा भाऊ असो की वडील माझा संसार उद्ध्वस्त केला. त्यांना फाशीची शिक्षा द्यायलाच हवी. माझ्या घरुन लग्नाला विरोध होता. माझे लग्न दुसरीकडे ठरवले होते म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केले. एक महिना आम्ही बाहेर राहिलो होतो. तेव्हा माझा चुलत भाऊ प्लानिंग करत होता. अमितचे मित्र सांगत होते. आप्पासाहेब आमच्याविरोधात प्लानिंग करत होता. तुमचा सैराट करु अशा धमक्या देत होता. आमच्या जीवाला धोका होता म्हणून कोणाला संपर्क केला नाही.
माझ्या नवऱ्यावर हल्ला करण्यात आला. तेव्हा मला कोणीही पुढे जाऊ दिले नाही. नंतर अमितला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात असतानाही ते म्हणत होते आप्पासाहेबांनी मारले. त्यांनी माझा हात धरला होता आणि तिथेच जीव सोडला, असे विद्याने म्हटले. मी माझ्या पतीला न्याय मिळावा म्हणून शेवटपर्यंत लढेन. माझ्या सासू-सासऱ्यांना माझ्याकडे बघून हिंमत येते. मग मी कशी हिंमत करु. मी त्यांच्याकडे बघून जिवंत आहे. माझा पूर्ण संसार गेला माझा नवरा गेला. वडिल मुलीचा विचार करतात, त्यांनी केला नाही. सध्या माणुसकीला महत्त्व आहे ती जपली पाहिजे, असंेी विद्या म्हणते.
दरम्यान, अमित साळुंके याने २ मे रोजी विद्या गीताराम कीर्तिशाही हिच्याशी पुण्यात आंतरधर्मीय प्रेमविवाह केला होता. या लग्नाला विद्याच्या कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे अमित आणि विद्या हे महिनाभर पुण्यात राहिले. मात्र, गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांच्या धमक्या सुरूच होत्या. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला गाठून मारले तर मदतही मिळायची नाही. त्यामुळे अमितच्या कुटुंबीयांनी त्यांना छत्रपती संभाजीनगरात बोलावून घेतले. लग्न होऊन अवघे अडीच महिने होताच गीताराम आणि अप्पासाहेब कीर्तिशाही यांनी १४ जुलैच्या रात्री अमितला गाठले आणि चाकूने भोसकले. त्याच्या पोट आणि मांड्यावर आठ वार करण्यात आले. तो गंभीर जखमी झाला. घाटीत उपचार सुरू असताना २५ जुलैला अमितने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर साळुंके कुटुंबीय आक्रमक झाले. त्यांनी जवाहरनगर ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत ठिय्या देत पोलिसांना धारेवर धरले होते.
त्यानंतर १४ जुलैपासून पसार असलेल्या आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांनाही पोलिसांनी आता अटक केली आहे. अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही (रा. इंदिरानगर) याला अटक केल्यानंतर दुसरा आरोपी आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदाराला जालना येथून अटक केली आहे. या प्रकरणात आता आरोपींची संख्या तीन झाली आहे. अप्पासाहेब अशोकराव कीर्तिशाही याला शनिवारी अटक केली होती. रविवारी पोलिसांनी सासरा गीताराम भास्कर कीर्तिशाही आणि त्याला मदत करणाऱ्या स्वप्नील पटेकर (२८, रा. जालना) या दोघांना अटक केली. या आरोपींना १ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.