‘मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, ईश्वर साक्ष…’; फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई : तब्बल बारा दिवसाच्या रस्सीखेचानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरु आहे. आपल्या राजकीय कारकीर्दीत फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसोबतच शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीदेखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांनी विशेष हजेरी लावली आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेते देखील शपथविधीला हजर राहणार नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारंसघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत.