अजित पवारांच्या कटाचा मी बळी ठरलो, राम शिंदे झाले भावूक

पुणे : विधानसभेच्या या निवडणूकीत महाविकास आघाडीने बहुमत मिळवले आहे. अजित पवार यांची राष्ट्रवादी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाने एकत्र मिळून ही निवडणूक लढवली होती. या तिन्ही पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांनी राज्यभरात एकदिलाने प्रचार केला होता. असे असले तरी भाजपाचे नेते राम शिंदे यांनी मात्र गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. माझ्याविरोधात कट शिजला, असा आरोप करून रोहित पवार यांच्या विजयासाठी अजित पवार यांनी प्रत्यक्षपणे मदत केल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे हा आरोप करताना ते भावूक झाले आहेत.
आज सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अजित पवार आणि रोहित पवार यांची भेट झाली होती. यावेळी ‘रोहित थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं, दर्शन घे काकांचं’, असा मिश्कील टोला अजित पवारांनी लगावला. यावर आता राम शिंदे यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले राम शिंदे ?
“कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो आहे. हे आज दिसून आलंय. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवारांकडे मागणी करत होतो. मी सभेला आलो असतो तर काय झालं असतं असं ते बोलले म्हणजे हा सुनियोजित कट होता. राजकीय सारीपाटात मी बळी ठरलोय. यासंदर्भात मी अगोदरच सांगितलं,” असे राम शिंदे यांनी म्हंटले आहे.
पुढे ते म्हणाले, “माध्यमांमध्ये बोलण्याची माझी इच्छा नव्हती, मात्र अजित पवार बोलले त्यामुळे बोलतोय. मला वाटतं की कौटुंबिक कलाह दरम्यान काही करार झाले, त्याचे प्रत्यय कर्जत जामखेडमध्ये जाणवला शरद पवार विधानसभेत पोहोचले तेव्हा माझा जन्म देखील झाला नव्हता. मोठी बलाढ्य शक्ती माझ्यासमोर होती. माझा सहावा क्रमांक लागतोय जो सर्वाधिक मतं घेऊन पराभूत झाला. महायुतीच्या लोकांबरोबर असं होत असेल तर बरोबर नाही. मतमोजणीसंदर्भात तक्रार केली आहे, मात्र ती फेटाळण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्याकडे पुन्हा अर्ज करणार असून ते काय निर्णय घेतात त्यानंतर पुढे कारवाई करणार आहे.”