मुस्लिम अभिनेत्याशी लग्नानंतर मला ‘लव्ह जिहाद आणि गोल्ड डिगर’ म्हणून ट्रोल केले गेले
मी फरहान अख्तरला डेट करण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर फार ट्रोल कऱण्यात आलं असं शिबानी दांडेकरने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं. यावेळी तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तरही दिलं.
ट्रोलिंगबद्दल सांगताना शिबानी म्हणाली की, ‘सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये काही तथ्य असेल तरंच तुम्ही त्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, असं मला वाटतं. लोक खोटं बोलत असतील तर त्याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम व्हायला नको’
‘मी फरहानबरोबर रिलेशनशिपमध्ये आले तेव्हा लोक मला ‘लव्ह जिहाद आणि गोल्ड डिगर’ या दोनच गोष्टी बोलायचे. फक्त लोक बोलतायत आणि त्यामुळे मी रडणारी नाहीये. मी गोल्ड डिगर नाही. तो मुस्लिम आहे हे खरंय आणि मी हिंदू आहे. आम्ही लग्न केलं आणि दोघंही खुश आहोत. त्यामुळे लोकांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं’ असं शिबानी स्वतःचा अनुभव सांगत म्हणाली.
पुढे शिबानी म्हणाली की, ‘लोक माझ्याबद्दल ही कोण आहे? फरहान अख्तरसोबत लग्न करण्यापूर्वी ही कोण होती? अशा कमेंट्स करतात. मी त्या वाचते आणि विचार करते की, मी माझ्या आयुष्यात काही केलंय का? मी त्याच्यासोबत लग्न करण्यापूर्वी कोण होती? किंवा त्याला भेटण्यापूर्वी ३९ वर्षे मी जगली आहे हे मला माहित आहे का? मी कोणत्याही अनोळखी व्यक्तीनं केलेल्या कमेंटवर विश्वास ठेवायचा की स्वतःच्या करिअरवर विश्वास ठेवायचा? असं मी स्वतःलाच विचारते.’
‘मीसुद्धा आता फोन हातात घेऊन कोणाच्याही पोस्टवर कमेंट करू शकते काहीही कारण नसताना. त्यामुळे हे लोक कारण नसताना अशा कमेंट्स का करतात हेच समजत नाही. पण आपण कसं वागायचं आणि अशा कमेंट्सना सामोरं कसं जायचं ते फक्त आपल्या हातात आहे’ असं शिबानी पुढे म्हणाली.