एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पाडू : जरांगे पाटील
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असलेला वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण आला. कराडवर हत्याबरोबरच पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कराड सीआयडीला शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहे. कराडच्या अटकेनंतर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून, या घटनेतील एकही आरोपी सुटता काम नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कराडच्या अटकेबाबत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आमच्या भावाची हत्या झाली. त्यातील आरोपी सुटता कामा नये. सीआयडी आणि पोलीस यांनी चौकशी करायची आहे. यांच्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
देशमुख कुटुंब दहशतीखाली आहे, ते लोक गुंडगिरी करणारे आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात कुठेही काडीही वाजता कामा नये. कुठे नखही दिसता कामा नये. हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, असे जरांगे पाटील म्हणाले. सोबतच, देशमुख कुटुंबाला संरक्षण पुरवले जावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
संतोष देशमुख यांचे कुटुंब जे मागणी करेल ते करा. मोठमोठे वकील द्या. पण या केसचा छडा लावा. या प्रकरणातला एकही माणूस सुटला, त्या दिवशी राज्य बंद पडलंच म्हणून समजा, असा इशाराच त्यांनी दिला.
दरम्यान, पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी कराडवर गुन्हा दाखल आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर 22 दिवसांनी तो सीआयडीला शरण आला. सीआयडीला शरण जाण्यापूर्वी कराडने व्हीडिओ शेअर करत भूमिका मांडली होती. ‘संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे,’ असे वाल्मिक कराडने व्हिडीओत म्हटले आहे.