आरक्षण द्या नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार : मनोज जरांगे
अंतरवली सराटी : लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. मात्र या वेळेस विधानसभेत एकहाती महायुतीची सत्ता आली असून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला आरक्षणाबाबत पुन्हा इशारा दिला आहे. आता सरकारने मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार, असा इशारा नव्या सरकारला मनोज जरांगेंनी दिला.
विधानसभेत मनोज जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. कोणत्या घटकानं श्रेय घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानातच नाही आणि तुम्ही म्हणता जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणता. आम्ही मैदानात नाही. कोण निवडून आलं कोण पडलं याचं आम्हाला सोयरसुतक नाही. जेवढे निवडून आलेत ते सगळे मराठा फॅक्टरमुळंच आले असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर हे सगळं कळायला तुमची हयात जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.
“मी राज्यात कुठे गेलो का, आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता आमचा पॅर्टन. मराठा आरक्षण लवकर द्यायचं. बेमानी करायची नाही असा सरकारला पुन्हा इशारा देण्यात आला आहे. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. आमचा कोणताही फॅक्टर नव्हता. असा काही फॅक्टर असता तर महायुतीला इतके यश मिळाले नसते.
मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर समजून घेण्यासाठी उभी हयात जाईल, आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारचा शपथविधी झाल्यावर आम्ही समाजाची बैठक घेणार आहोत आणि आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसतील,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचेही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचं नाही हुरळून जायचं नाही. मराठ्यांना छेडण्याचं काम करायचं नाही. मी निवडणुकीत सांगितलं होतं मराठा समाज मालक आहे योग्य लोकं निवडा. मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता,” असा दावाही त्यांनी केला आहे.
“काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. एक महिनाभर थांबा, तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली तर नीट कारभार करा,” असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला.