महाराष्ट्रात नवीन कार घेताय, तर द्यावे लागेल पार्किंग सर्टिफिकेट

मुंबई : वाढत्या वाहतूक कोंडी आणि प्रदुषणावर आळा घालण्यासाठी महाराष्ट्राचे नवीन धोरण आणू इच्छित आहे. त्यानुसार नवीन गाडी घ्यायची असेल तर पार्किंग सर्टिफिकेट असणे गरजेचे राहणार आहे. अन्यथा महाराष्ट्रात वाहन खरेदी करणे शक्य होणार नाही. काही वर्षांपूर्वी पार्किंगची सोय असेल तरच वाहन खरेदी करता येणार अशा योजनेची महाराष्ट्रात चर्चा सुरु झाली होती. परंतू, हा प्रस्ताव थंड बस्त्यात गेला होता. आता पुन्हा याची चर्चा सुरु झाली आहे.
हा नियम लागू झाल्यास वाहनाच्या मालकांना त्यांच्याकडे गाडी लावण्यासाठी पुरेशी जागा आहे याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पार्किंग प्रमाणपत्र नसल्यास नवीन कारचे रजिस्ट्रेशन करता येणार नाही. वाहतूक कोंडी व प्रदुषणाची समस्या कमी करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलले जाऊ शकते.
रिपोर्टनुसार, अशाप्रकारचा नियम लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. सरकार राज्यातील प्रमुख शहरातील वाहतूक कोंडी व वायू प्रदुषणाची स्थिती सुधारण्यासाठी 100 दिवसांच्या एका विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करू शकते.
सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खासगी वाहनांवर हळूहळू काही निर्बंध लादले जाऊ शकतात. मात्र, सरकारकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.