छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील, होणार तिहेरी लढत

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येथे महायुती आणि महाविकास आघाडीने आपापले उमेदवार दिले आहेत. असे असतानाच आता एमआयएम या पक्षानेही या विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पूर्व या जागेवरून तिकीट मिळाले आहे. त्यामुळे जागेवर थेट तिहेरी लढत होणार आहे.
एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे सूतोवाच केले होते. आमची यादी तयार आहे, असे जलिल म्हणाले होते. त्यानंतर 26 ऑक्टोबरच्या रात्री जलील यांना औरंगाबाद पूर्व या मतदारसंघासाठी एमआयएम पक्षाने उमेदवारी दिली. जलील यांनात तिकीट मिळाल्यानंतर या भागात जल्लोष करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औरंगाबाद पूर्व हा मतदारसंघ फार महत्त्वाचा आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याकांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच जलील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचे नेते अतुल सावे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला सुटलेला आहे. या जागेसाठी काँग्रेसने एम के देशमुख यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता थेट तिहेरी लढत होणार आहे.
जलील यांनी एमआयएमच्या या निवडणुकीतील भूमिकेवर 26 ऑक्टोबर रोजी भाष्य केलं होतं. आता सगळं संपलं आहे. आमची यादी तयार आहे. आम्ही आता स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहोत, असे जलिल म्हणाले होते. म्हणजेच आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमने उडी घेतली असून हा पक्ष काही मोजक्या जागा स्वतंत्रपणे लढवणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जलील यांना औरंगाबाद पूर्वमधून तिकीट जारी करण्यात आलं आहे.