मुंडेचा राजीनामा न घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? : आदित्य ठाकरे

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटून गेला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड हा कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगत विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तसेच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण रोखत आहे? असा थेट सवाल त्यांनी केला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना आदित्य ठाकरे यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना, “त्यांना राजीनामा देण्यापासून तसेच मुख्यमंत्र्यांना त्यांचा राजीनामा घेण्यापासून कोण अडवत आहे? मुख्यमंत्र्यांवर काही राजकीय दबाव आहे का? की काही वेगळा युतीधर्म आहे. हे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे.” असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना आदित्य ठाकरे यांनी, “हे सगळे मीडियातून, लोकांच्या बोलण्यातून आणि राजकीय स्तरावर होणाऱ्या चर्चांमधून समोर येत आहे. पण राजीनामा काही घेतला जात नाही. म्हणजे त्यांना मुख्यमंत्र्यांचे पूर्ण संरक्षण आहे.” दरम्यान यावेळी अदित्य ठाकरे यांनी, हे ईव्हीएम सरकार असल्याचे म्हणत जेवढे भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांना हे सरकार संरक्षण देत राहिल, अशीही टीका यावेळी त्यांनी केली.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केलेलं आहे. तसेच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा या संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाल्मिक कराडवर मोकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील नेत्यांनीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली आहे.