पक्षाचे नाव आणि चिन्ह घेणं योग्य नाही, राज ठाकरेंची शिंदे-पवारांवर टीकास्त्र
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावरून एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. राज्यातील दोन प्रमुथ पक्षातील फूट आणि चिन्ह हिसकाविण्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सुनावले. “पक्षाचे नाव आणि चिन्ह घेणं योग्य नाही,” असं म्हणत त्यांनी शिंदे-पवारांच्या सत्तास्थापनेवर आणि राजकीय संघर्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे यांनी सांगितलं की, “मी माझ्या पक्षाचे नाव आणि चिन्ह स्वतःच्या मेहनतीने कमावले आहे, ते कोणाकडून घेतलेले नाही.” राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या विषयी स्पष्ट विचार मांडला आहे. राज ठाकरे म्हणाले, “माझ्या पक्षाची निशाणी लोकांच्या मनातून आलेली आहे कोर्टातून नव्हे. कुठल्याही पक्षासाठी असं होऊ नये की त्यांच्या मूळ पक्षाची ओळख त्यांच्यापासून हिरावली जावी. मला स्वतःला नवीन पक्ष काढायचा होता, म्हणूनच मी मेहनतीने मनसेची ओळख निर्माण केली आहे.”
शिवसेना आणि भाजपच्या सत्ता स्थापनेवर अप्रत्यक्ष टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “सत्तेत येण्यासाठी शिवसेना आणि भाजपला वेळ लागला, पण आता फोडाफोडीचं राजकारण समोर आलं आहे.” यावेळी त्यांनी ‘धनुष्यबाण’ चिन्हाबद्दल उल्लेख केला. “उद्धव ठाकरे यांनी ‘धनुष्यबाण’ ही चिन्ह जरी कमावलेली नसली तरी बाळासाहेब ठाकरे यांनी ती शिवसेनेची ओळख म्हणून बनवली आहेत,”
शिवसेनेचे नाव आणि चिन्ह बदलण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत त्यांनी म्हटलं, “अनेकांना वाटलं की मी शिवसेनेवर दावा करेन, पण मला त्याचं विचारसुद्धा शिवला नाही. फक्त शिवसेनेत माझं स्थान काय असेल एवढा माझा प्रश्न होता.”
राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या निवडणुकीच्या तयारीवरही भाष्य केलं. “अमित समोर पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत, पण मला असं वाटत नाही की राजकारण आणि नातेसंबंध यामध्ये आणावेत. आम्ही आदित्य ठाकरेंना पाठींबा दिला होता तो माझा निर्णय होता. पण समोरच्याने देखील मी विचार केला तसा करावा, या विचाराचा मी नाही”, असे राज ठाकरे म्हणाले.
२०२४ च्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत बसण्याची आशा व्यक्त करत राज ठाकरे यांनी सांगितलं की, “महाराष्ट्राने एकहाती सत्ता द्यावी, ही माझी इच्छा आहे.” दक्षिण मुंबईच्या जागेबद्दल बोलताना ते म्हणाले की, “जर आम्ही दक्षिण मुंबईची जागा लढवली असती तर निकाल वेगळा असता.”