देश-विदेशभारत

मरावे परी कीर्ती रूपी उरावे – वरिष्ठ पत्रकार प्रसाद गोसावी यांचे ह्रदय लष्करी जवानाला, ५ जणांना मिळाले नवजीवन 

पुणे : पुण्यातील ‘पोलीसनामा’ या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ पत्रकार प्रसाद गजानन गोसावी (वय ४५) यांचे रविवार (दि.१ सप्टेंबर) रोजी निधन झाले. २२ जुलै रोजी घरी परतत असताना गोसावी यांचा अपघात झाला. त्यांच्यावर सुरुवातीला वायसीएम रुग्णालयात आणि नंतर निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या आठवड्यात त्यांना पक्षाघाताचा झटका आला आणि ते कोमात गेल्यानंतर त्यांना डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या नंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयवदान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्युसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच दोन फुफ्फुसे, यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन डोळे या अवयवांचे दान करण्यात आले, त्यामुळे एकूण पाच रुग्णांना नवीन जीवन मिळाले.

या बाबत प्रसादचे नातेवाईक वरिष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद गोसावी हा २२ जुलै रोजी पुणे शहरातून त्याच्या दुचाकीवरून यमुनानगर येथील त्याच्या घरी जात असताना रस्त्याच्या कडेला तो त्याच्या दुचाकीसह रस्त्यावर पडलेला आढळून आला. हा अपघात कसा झाला हे कोणालाच माहीत नाही, नेमकं काय झालं, त्याचे वाहन घसरले का कोणत्या वाहनाचा धक्का लागला काहीच माहित नाही. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती, त्यामुळे त्याचा एक पाय कापावा लागला, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या अपघातात त्याच्या मेंदूला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याचा जीव वाचवण्याचे आव्हान डॉक्टरांच्या पुढे होते. उपचार सुरु असतानाच पायाच्या संवेदना नाहीशा झाल्यामुळे दुर्दैवाने त्याचा उजवा पाय पोटरीपासून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण त्याचा जीव वाचणे महत्वाचे होते. त्यानंतर प्रकृती सुधारत असतानाच अचानक मेंदूत रक्तस्त्राव झाल्यामुळे शुद्ध हरपली. डॉक्टरांनी त्यांच्या परीने अथक प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण प्रसादच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर डॉक्टरांनी प्रसाद ब्रेनडेड झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे प्रसादच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पण या परिस्थितीत डगमगून न जाता त्यांनी प्रसादचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. प्रसादचे डोळे, हृदय,फुप्फुसे, यकृत, एक किडनी हे अवयव काढून घेण्यात आले.

 

प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस व लष्करी जवानांच्या संरक्षणात त्याचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डी.वाय.पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर व व कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयवदानानंतर त्याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर गोसावी यांच्या पार्थिवावर निगडी स्मशानभूमीमध्ये रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे भाऊ, बहिणी, पुतणे असा परिवार आहे.

प्रसाद गोसावी यांनी ‘एमपीसी न्युज’ ला जवळपास १० वर्षे काम केले होते. सध्या ते ‘पोलीसनामा’ या न्यूज पोर्टलवर काम करत होते. आज प्रसाद या जगात नसला तरीही त्याचे हृदय अजूनही धडधडत आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. अवयवदानामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. मृत्यूनंतर अवयवदान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button