KDMC ‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसर अजूनही नशेखोरांचा अड्डा? सामाजिक कार्यकर्त्यांनी तिघांना केलं पोलिसांच्या हवाली

कल्याण (संतोष दिवाडकर) : मंदिरातील निर्भया कांड प्रकरणाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. कल्याण पूर्वेतील सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कल्याण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र येथे ही सभा पार पडली. या सभेला विधान परिषदेचे माजी आमदार जगन्नाथ शिंदे, माजी नगरसेवक महेश गायकवाड, हर्षवर्धन पालांडे, उदय रसाळ, शरद पाटील, राधिका गुप्ते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
मंदिराचे पावित्र्य पायदळी तुडवून सामूहिक बलात्कार आणि हत्या करणाऱ्या अटकेत असलेल्या आरोपी मिश्रा पांडे, आणि शर्मा यांना फाशी व्हावी कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच विभागा विभागात WCR (वुमन कॉमन रूम) पालिकेच्या/शासनाच्या माध्यमातून उभे करण्यात यावेत. ज्यात स्वच्छ, सुशोभीत व टीव्ही असलेला हॉल, वाचनालय, महिला समुपदेशक, चेंगिंग रूम, टॉयलेट, महिला पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था महिलांसाठी करावी. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
ही बैठक संपल्यानंतर मात्र त्यांना याच परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला. काही तरुण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानकेंद्र जवळ असलेल्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करत होते. शौचालय चालक ही त्यांना मिळाला असल्याचे सांगण्यात येते. हा सर्व प्रकार निदर्शनास आल्यानंतर उपस्थित्यांनी हल्ला बोल करीत त्या शौचालयाच्या ठिकाणी नशा पाणी करता यावं म्हणून केलेले शेड, काढून टाकण्यात आले. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. तिथे चिलीम आणि नशेचे पदार्थ असल्याचे उपस्थितांच्या निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले. तात्काळ तरुणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या तरुणाईला बाहेर काढण्यासाठी अवैध धंद्यांवर बुलडोझर चालविण्याचे आदेश महानगरपालिकेला दिले. मात्र याच महापालिकेच्या नाकाखाली बसून नशापाणी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला असून ‘ड’ प्रभाग क्षेत्र अजूनही नशेखोरांपासून मुक्त झाला नसल्याचे समोर आले आहे.
कल्याण पूर्वेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन, जिथे जिथे अवैध धंदे, नशा पाणी केंद्र चालतात त्यावर कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी, निवेदन करून बैठकीत मांडावी यासाठी माझाही पुढाकार असेल. जगन्नाथ शिंदे (माजी विधानपरिषद सदस्य)
‘ड’ प्रभाग क्षेत्र परिसरात एक शौचालय आहे. या शौचालयाच्या आवारात बसून एक इसम लोकांकडून गैरप्रकारे पैसे गोळा करतो. आणि तिथेच छप्पर बांधून तो नशेखोरांना जागा तयार करून देतो. या ठिकाणी चरस गांजाचे सेवन केले जाते. ही गंभीर बाब असून सदर इसमालाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. -हर्षवर्धन पालांडे (माजी नगरसेवक)
‘ड’ प्रभाग क्षेत्राच्या परिसरात गांजा, चरस अशा अमली पदार्थ सेवन केले जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलीस स्थानकात करण्यात येतात मात्र त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. काही तरुणांना आम्ही पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले असून त्यांनी बनवलेले छप्पर देखील तोडले आहे. महिलांनी असाच आवाज उचलल्यास अशा गोष्टी बंद होतील असे मला वाटते. -उदय रसाळ (माजी नगरसेवक)
‘ड’ प्रभाग क्षेत्रात लोक संध्याकाळी फेरफटका मारायला येतात. याठिकाणी सुंदर असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र उभारले आहे. आणि अशा पवित्र वास्तूच्या परिसरातील आवारात अशा गोष्टी करणे ही शर्मेची बाब आहे. यागोष्टी कुठे ना कुठे थांबविण्याची आपल्याला गरज आहे. -शाहीन मुल्ला (समाजसेविका)