पाेलीसांनाे, अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ, की बायकोला फोनही लागणार नाही : नितेश राणे
तर राणेच्या या वक्तव्यावर इम्तियाज जलील यांची शेंबड पोट म्हणून आगपाखड

सांगली : सरकार हिंदुत्वाचं आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, पोलिसांनो, अशी सगळी मस्ती जर कराल, तर तुम्हाला अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ, की बायकोला फोनही लागणार नाही, अशी तंबी भाजप नेते नितेश राणे यांनी पोलिसांना दिली आहे.
तर नितेश राणे हा शेंबड पोट आहे. त्याला महत्व देऊ नका. चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला थाेबाडीत मारलं असतं, असे विधान एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे केले आहे.
पलूस शहरात लव्ह जिहादच्या विरोधात भाजप खासदार अमर साबळे, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक्ती-भीमशक्ती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आयोजित सभेत बोलताना नितेश राणेंनी पोलिसांना तंबी दिली.
काय म्हणाले नितेश राणे?
“पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांना सांगणे आहे की, सरकार हिंदुत्वाचं आहे. गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तुम्हाला जर पोस्टिंगवरुन मजा येत नसेल आणि अशी मस्ती जर कराल, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये बदली करू की जिथे बायकोला फोनही लागणार नाही” असा दम नितेश राणे यांनी भरला.
“माझ्या भगिनीची केस तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आली, आणि पुढच्या अर्ध्या तासात जर ती केस दाखल झाली नाही ना, तर त्या पुढच्या तीन तासात मी तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन धिंगाणा घालेन लक्षात ठेवा” असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिला. “मी नुसतं तोंडावर बोलत नाही, मी कुणाला धमकी देत बसत नाही, पण शेवटी आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आम्हाला मारलं जातंय” असंही ते म्हणाले.
तर पोलीस अधिकाऱ्यांने थाेबाडीत मारली असती : जलील
छत्रपती संभाजीनगर : पोलीसांबाबत आक्षेपार्ह बाेलणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी आगपाखड केली आहे. नितेश राणे हा शेंबड पोट आहे. त्याला महत्व देऊ नका. चांगला पोलीस अधिकारी असता तर त्याला थाेबाडीत मारलं असतं. राज्यात काही कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही? नितेश राणेंपेक्षा घाण मी बोलू शकतो. तो सकाळी उठला की हिंदू हिंदू करतो, असे इम्तियाज जलील यांनी म्हटले.