महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर २८८ जागा लढणार!
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. आगामी विधानसभेसाठी महादेव जानकर यांचा राष्ट्रवादी समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. महादेव जानकर यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे. राज्यातील २८८ जागांवर महादेव जानकर उमेदवार देणार असल्याची जानकरांनी घोषणा केली आहे. मागी काही दिवस महादेव जानकर महायुतीत नाराज असल्याची बातमी होती. अशातच ऐन विधानसभेच्या तोंडावर महादेव जानकर यांनी महायुती सोडत असल्याचे जाहीर केले आहे. याचा फटका विधानसभेत काही अंशी महायुती आणि महाविकास आघाडीला बसू शकतो.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी युतीसोबत होते. परंतु आता ऐन विधानसभेच्या तोंडावर महादेव जानकर यांनी युतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणताही संपर्क नाही आपण आपल्या पक्षासाठी बाहेर पडत आहोत असे एका वृत्तवाहिनींसोबत बोलताना जानकरांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळेच त्यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष आता राज्यात सर्व जागा स्वबळावर लढणार आहेत.
महादेव जानकरांनी लोकसभा निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातून लढवली होती. मात्र परभणीतून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर विधानसभेला आपल्या पक्षाला सन्मानजनक जागा मिळाव्यात यासाठी जानकर प्रयत्नशील होते. पण त्यांना अपेक्षित जागा मिळणार नाही असं लक्षात येताच त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.