महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षासाठी अनेकांची असमर्थता, हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. 101 जागा लढवून काँग्रेसला केवळ १६ जागा जिंकता आल्या. या पराभवानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण वरिष्ठांकडून त्यांना पदावर कायम राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या घडामोडीनंतर आता काँग्रेस पक्षांतर्गत राजकीय हालचालींना वेग आला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठांकडून सतेज उर्फ बंटी पाटील तसेच आमदार अमित देशमुख यांना विचारणा झाली होती, मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला पसंती दिल्याची माहिती आहे. या अनुषंगाने आता पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला देखील रवाना झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल झाल्याचं दिसू शकतं, अशी माहिती आहे.
पृथ्वीराज चव्हाणनंतर ही ओबीसी नावे चर्चेत
प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर होते. लोकसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी ते उत्सुक होते. मात्र, नाना पटोले पदावर कायम राहिले. आता प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांना सूचना करण्यात आली मात्र त्यांनी आपली असमर्थता दर्शवली.
सतेज पाटील यांच्यानंतर आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रदेशाध्यपदाबाबत विचारणा करण्यात आली होती. मात्र त्यांनीही प्रदेशाध्यक्षपद इतक्यात नको, अशी भूमिका घेत हात वर केले आहेत. देशमुख आणि पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी सध्या इच्छुक नसल्याचे पक्षप्रश्रेष्ठींना स्पष्टपणे कळविल्याचे खात्रीदालयक माहिती आहे.
दोन नेत्यांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी नकार दिल्यानंतर तिसरा पर्याय म्हणून विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागलेल्या यशोमती ठाकूर आणि माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चाचपणी सुरू झाल्याची माहिती आहे.