महायुतीत कलगीतुरा : राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर भाजपने स्वबळावर लढावे : कदम
भाजपचे देेवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी कदमांना सुनावले

मुंबई : विधानसभा निवडणुक जवळ येत असतानाच नेत्यामंडळीमध्ये चांगलेच वाक्युध्द सुरु झाले आहे. महायुती-महाआघाडीतील नेत्यामध्ये तर वाद-िववाद होतच असतात. पण आता महायुतीच्या मित्रपक्षामध्येसुध्दा चांगलेच विवाद होताना िदसत आहे.
भाजपाला जर राक्षसी महत्त्वाकांक्षा असेल तर युती तोडावी तुम्ही तुमचे लढा, आम्ही आमचे लढू, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आम्हीही माणसं आहोत, आमचीही मनं दुखावतात. याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार असल्याचे म्हटले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकारचे आरोप करणे हे कुठल्या युती धर्मात बसते. त्यामुळे जर रामदास भाईंचे काही म्हणणे असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडले पाहिजे. प्रत्येक वेळी भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना अशा प्रकारे वेठीस धरणे यातून एक चांगली भावना तयार होत नाही, असे मला वाटते. तरी मी भाईंचे काय म्हणणे आहे हे समजून घेईल आणि त्यातून मार्ग काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तर या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले की, रामदास कदम यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याने अपरिपक्व वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यांचे काहीही म्हणणे असेल तर ते त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चार भितींच्या आत सांगून त्यावर मार्ग काढावा. पण रामदास कदम यांचा स्वभाव अशाप्रकारची खळबळजनक वक्तव्ये करायची आणि वाद निर्माण करायचा असा आहे. तुम्ही बोललात तर आम्हालाही बोलता येते. रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत आधी तुम्ही वक्तव्ये केलीत. महायुतीत धर्म पाळायला हवा. तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायची. रायगड रत्नागिरी आमचं सांगता. मग भाजपाच्या कार्यकर्त्यांची पण अस्वस्थता समजून घ्या. ठाण्यात तीन आमदार आमचे आहेत. नरेश म्हस्केंना, रवींद्र वायकरांना खासदार आमच्या लोकांनी केले. तुम्हाला नाशिक, डोंबिवलीची जागा दिली. उणीदुणी काढलीत तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज सगळ्यांना आहे. उद्या आमच्या बाजूनेही बोलतील. रामदास कदमांनी चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. भाजपाला युतीची गरज आहे अशा भ्रमात ते असतील तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.
रामदास कदम यांची वैयक्तिक कारणातून आलेली खदखद आहे. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे त्याठिकाणी भाजपा नसेल तर निवडूण येणे अवघड होणार आहे. रामदास कदमांच्या मुलाला मंत्री व्हायचे होते. मुलगा मंत्री न झाल्याने ते बैचेन आहेत. त्यामुळे ते वैफल्यातून खदखद बाहेर येत आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांचा संयम आहे याला तुम्ही आमचा दुबळेपणा समजू नका. भाजपा राष्ट्रीय पक्ष आहे. सारख्या हुलकावण्या मारणार असाल तर आम्ही सहन करायला बसलेलो नाही, असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला.