महायुतीचा अमित ठाकरे यांना पाठिंबा, परंतू महायुतीचाच उमेदवार विरोधात

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अमित ठाकरे यांना माहीममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांना भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या भूमिकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान स्थानिक आमदार सदा सरवणकर हे माघार घेण्यास तयार नसल्याची माहिती समोर येत आहे. सदा सरवणकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी सदा सरवणकर यांना काय तो निर्णय घेण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला. यानंतर रात्री उशीरा सरवणकर पुन्हा ‘वर्षा’ बंगल्यावर गेले होते. मात्र ही बैठक अवघ्या 10 मिनिटांमध्ये संपली आणि सरवणकर बाहेर पडले. सरवणकर आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
सदा सरवणकर यांना आपली भूमिका ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पहिल्यांदा झालेल्या भेटीदरम्यान 24 तासांची मुदत दिली. मनसेकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघासहीत काही ठिकाणी उमेदवार दिला जाणार नाही. त्यामुळेच मनसेसाठीही महायुतीने सहकार्य करावं अशी मागणी असल्याचे समजते. महायुतीकडून माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरेंना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत आहे. आपल्या या भूमिकेवर महायुती ठाम असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सदा सरवणकर यांना सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या वेळेस महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. यापुढेही त्यांची मदत होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना सांगितलं असल्याचं समजत. या चर्चेनंतर सरवणकर पुन्हा ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले होते.