मुंबईत मुसळधार पाऊस, घरांमध्ये घुसलं पाणी; भरतीमुळे समुद्राला उधाण

मुंबई : मान्सूनमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये संततधार पाऊस पडत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचले होते. 20 ते 21 जुलै दरम्यान मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या समुद्रात आज साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची मोठी भरती असल्याने मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंचच्या उंचच लाटा येऊन धडकत आहेत. त्यामुळे मुंबईतील काही घरांमध्ये पाणी घुसलं आहे.
मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे अरबी समुद्राला उधाण आले आहे. त्यातच आज साडेचार मीटर पेक्षा जास्त उंचीची मोठी भरती आली असून समुद्र किनाऱ्यावर उंच लाटा येऊन धडकत आहेत. यामुळेच दादर चौपाटीवर असलेला विविंग डेक बंद ठेवण्यात आला आहे. मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय. तर दुसरीकडे समुद्राला भरती पाहायला मिळतेय. समुद्रकिनारी पाऊस आणि उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेत मुंबईकर आणि पर्यटक पाहायला मिळत आहेत. दरम्यान, पावसामुळे लोकलसेवेसह इतर वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे.
भरतीच्या वेळी विशेष काळजी घ्या
21 आणि 22 जुले हे मुंबईसाठी जोरदार पावसाचे दिवस असणार आहेत. त्याचबरोबर आजही अधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहील. आज (20 जुलै) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास उच्च भरतीचा इशारा जारी करण्यात आला कारण उच्च भरतीच्या वेळी शहराच्या किनारपट्टीवर 10 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. यामुळे पूरप्रवण किनारपट्टीच्या सखल भागात पाण्याचा उलटा प्रवाह होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
महिन्यातील सर्वाधिक पावसाची होऊ शकते नोंद
बंगालच्या उपसागराचा कमी दाब 21-22 जुलैपर्यंत कमी होईल. मात्र, मुंबई आणि परिसरात येत्या ४-५ दिवसांत म्हणजे २५ ते २६ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. त्यानंतरही पाऊस पूर्णपणे थांबणार नाही. त्यामुळे, मुंबई जुलैमध्ये महिन्यातील सर्वाधिक पावसाचा विक्रम करण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.