मिंधे, टरबुज्याची बॅग तपासणार का? बॅग तपासणीवरून उद्धव ठाकरे संतापले
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते वणीला सभेसाठी गेलेले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. त्यातील सामान निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासलं. त्यावेळी ठाकरे काहीसे संतापले. माझी बॅग तपासली तशी मोदी, शहांची बॅग सुद्धा तपासा असं आव्हान ठाकरेंनी दिलं. मिंधे, टरबजूची बॅग तपासणार का, असा सवाल त्यांनी विचारला.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक #निवडणूक – २०२४ | महाविकास आघाडीचे #वणी विधानसभेचे अधिकृत उमेदवार #संजय देरकर ह्यांच्या प्रचारार्थ जाहीर #सभा | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | वणी – #LIVE https://t.co/3ismiBTwiD
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 11, 2024
उद्धव ठाकरे म्हणाले की, मी प्रचाराला आल्यानंतर सात ते आठ अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे. जिथे कुठे नाकानाक्यावर अडवतील तिथे-तिथे तपास अधिकाऱ्यांचे खिसे तपासा. माझ्या बॅगा तपासल्याबद्दल मी अधिकाऱ्यांवर रागावलो नाही. पण त्यांनी जशी माझी बॅग तपासली, तशी मोदी-शाहांची बॅग तपासण्याचे धाडस दाखवावे. त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेटसह टरबुजाचीही (फडणवीस) बॅग तपासण्याची गरज आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी वणीमधील सभेमधून बोलताना पीएम मोदी, अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे म्हणाले की स्वतः मोदी यांना बाळासाहेब यांचे नाव घेऊन मते मागावी लागत आहेत. त्यामुळे मोदी गॅरेंटी चालत नाही हे आता कळालं आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आपण तीन हजार रुपये देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगित. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार करून पेटवून दिलं जात आहे. महिला सुरक्षेबद्दल काही बोललं जात नाही. ठाकरे म्हणाले की, हा वाघांचा परिसर आहे. मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी महिलेबद्दल काय बोलले? असे चालतात तुम्हाला अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही सोयाबीन भाव दिला की नाही? कापसाला भाव दिला की नाही? पीक विमा दिला. त्यांनी 370 कलम काढले, काय फायदा झाला? बाळासाहेब भाजपला कमलाबाई असे म्हटले होते. काँग्रेससोबत राहिलो तर शिवसेनेची काँग्रेस होईल का? असेही ते म्हणाले.
अधिकाऱ्यानं हेलिकॉप्टरमधील सामानाची तपासणी सुरु केली. एका बॅगमध्ये असलेली डबासदृश्य वस्तूही त्यांनी ठाकरेंसोबत असलेल्या व्यक्तीला उघडायला सांगितली. त्यावर ‘काय उघडायचं ते उघडा. नंतर मी उघडतो तुम्हाला’, असं ठाकरे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले. हे अधिकारी कोणत्या शासकीय नोकरीत आहेत बघून घ्या, अशी सूचना ठाकरेंनी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला केली.
वणीत नेमकं काय घडलं? ठाकरेंचा अधिकाऱ्याशी काय संवाद झाला?
ठाकरे- काय नाव तुमचं? कुठचे तुम्ही?
अधिकारी- माझं नाव अमोल घाटे. मी मूळचा अमरावतीचा.
ठाकरे- माझी तपासताय बरोबर आहे. माझ्या आधी कोणाची तपासली?
अधिकारी- पहिलाच दौरा तुमचाच आहे.
ठाकरे- हो हो. माझा दौरा पहिला आहे. पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासली आहे?
अधिकारी- ४ महिने आलेत मला सेवेत येऊन
ठाकरे- ४ महिन्यात एकाचीही नाही तपासली? मीच पहिला गिऱ्हाईक सापडलो.
अधिकारी- नाही साहेब, असं काही नाही. तुमची बॅग..
ठाकरे- नाही माझी तपासा तुम्ही. मी तपासायला अडवत नाही. पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंध्याची तपासलीय का, देवेंद्र फडणवीसची तपासलीय का, अजित पवारची तपासली का? मोदींची तपासलीय का? अमित शहांची तपासली का?
अधिकारी- साहेब, अद्याप ते आले नाहीत.
ठाकरे- आले नाहीत नाही.. आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा.
अधिकारी – हो साहेब नक्की साहेब.
ठाकरे- मोदींची बॅग तपासतानाच तुमचा व्हिडीओ आला पाहिजे. तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची. हा व्हिडीओ मी रिलीज करतोय. ठीक आहे. तपासा बॅग माझी. माझं युरिन पॉट पण तपासा.