नवी दिल्ली : गौतम अदानी लाचखोरी प्रकरणावरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी संसदेत जोरदार आवाज उठवला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या संकुलात निदर्शने केली. अदानी मुद्द्यावर गुरुवारी संसदेत ‘मोदी अदानी एक है’ असा नारा असलेली जॅकेट घालत काँग्रेस खासदार उपस्थित राहिले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “मोदीजी अदानींची चौकशी करू शकत नाहीत, कारण मोदी आणि अदानी एक आहेत.” बुधवारी देखील अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अदानी महाभियोगाच्या मुद्द्यावर संसदेच्या संकुलात निषेध केला आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशीची मागणी केली. काँग्रेस, आप, आरजेडी, शिवसेना (यूबीटी), डीएमके आणि डाव्या पक्षांच्या खासदारांनी त्यांच्या मागणीच्या बाजूने घोषणाबाजी केली. यादरम्यान विरोधी खासदारांनी संसदेच्या गेटवर ‘मोदी-अदानी एक है’ असे लिहिलेले बॅनर लावून धरले होते.
इंडिया आघाडीत मतभेद
मात्र या आंदोलनातून इंडिया आघाडीतील घटक पक्षांमध्येच मतभेद पाहावयास मिळाले. या आंदोलनापासून तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्ष स्वत:ला दूर ठेवले. सहभागाबद्दल बोलताना तृणमूल काँग्रेसचे खासदार कीर्ति आजाद म्हणाले की, संसदीय रणनीतीबाबत बोलायचे तर आम्ही एकत्रच आहोत. पण असे असले तरी, पक्षाला वेगवेगळे मुद्दे सोडवायचे आहेत. आझाद म्हणाले म्हटले की, “सभागृहाच्या पटलावर, आमची रणनीती सारखीच आहे, परंतु त्याच वेळी, आम्हाला इतर वेगवेगळे मुद्दे ठळकपणे मांडायचे आहेत.” दरम्यान, समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनीही या आंदोलनात सहभागी नसल्यबाबत बोलताना टाळाटाळ करत दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले की, आम्ही कुठे एकत्र नाही? निषेध म्हणून आम्ही एकत्रच आहोत.