मस्साजोग हत्या प्रकरणातील तीन आरोपींचा खून : दमानिया
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतू मुख्य आरोपीसह अन्य तीन आरोपी अद्यापही पोलिसांच्या तावडीत सापडले नाही. आज आरोपींना अटक करावी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी १० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यात बजरंग सोनवणे, सुरेश धस, जितेंद्र आव्हाड, छत्रपती संभाजी राजे भोसले आणि मनोज जरांगेंसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे. त्यापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक मोठा दावा केला आहे.
या प्रकरणात फरार असलेल्या 3 आरोपींचा खून झाल्याचा गंभीर आरोप अंजली दमानियांनी केला. यासंदर्भात फोन आल्याचा दावा अंजली दमानियांनी केला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत चार आरोपी अटकेत आहेत. तर वाल्मिक कराड यांना खंडणीप्रकरणात अटक होत नसल्याने रोष व्यक्त होत आहे. त्यातच उर्वरीत तीन आरोपी अजूनही का पकडले जात नाहीत, यावरून राज्यात संतापाचे वातावरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
अंजली दमानिया म्हणाल्या की, “काल रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजता मला एक फोन आला. अनोळखी इसमाने आधी मला व्हॉट्सअप कॉल केले. परंतु कॉल कनेक्ट होत नव्हता. त्यामुळे त्यांनी मला व्हाईस मेसेज टाकले. त्यात त्यांनी इतर तिन्ही आरोपींचा मर्डर झाल्याचं सांगितलं. आता हे आरोपी पोलिसांना सापडणारच नाही. यानंतर मी ही माहिती पोलिस अधीक्षकांना दिली आहे. सात आरोपींपैकी तिघांची हत्या झाल्याचं मला सांगण्यात आलेलं असून ती प्रेतं नेमकी कुठे आहेत, याची जागासुद्धा सांगितली आहे. हे खरं की खोटं, हे मला माहिती नाही.” या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करुन धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अशी मागणीही अंजली दमानिया यांनी केली आहे.
संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. आज (दि.28) या मूक मोर्चामध्ये साधारण 50 गावांचे लोक सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. या मोर्चामध्ये राजकीय नेते देखील असणार आहेत. मात्र अंजली दमानिया या मोर्चामध्ये सहभागी होणार नाहीत. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “या मोर्चामध्ये सर्व राजकारणी मंडळी आहेत. या मोर्चात शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस सामील होत आहेत. हे सर्व राष्ट्रवादीत असताना त्यांना धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड काय चीज आहे, हे माहीत होते. आधी पक्षात असताना त्यांना हे लोक चालत होते, मात्र आता पक्ष बदलल्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे मोर्चे काढत आहेत. हे सर्व राजकारण असून खरंतर देशमुख कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरून वेगळे आंदोलन उभे करण्याची गरज आहे, असे मत अंजली दमानिया यांनी व्यक्त केले आहे.