क्राइम स्टोरी

Crime Story : चारित्र्याच्या संशयाचे संसाराला लागले ग्रहण! वैशालीचा करून खून अर्जुनने पत्करले मरण!

नाशिक : सोमनाथ तुळशीराम कोदे रा. देशमुखनगर, पो. कुकडणे, ता. सुरगाणा याची बहीण वैशाली हिचे लग्न अर्जुन शामल पवार रा. बिशोनिया, ता. ब्यारा, जि. तापी (गुजरात) याच्यासोबत सात वर्षापूर्वी झाले होते. वैशाली व अर्जुन हे होळी सणापासून भाऊ सोमनाथच्या घरी रहायला आले होते. सोमनाथ हा विभक्त रहात होता. थोड्याच अंतरावर सोमनाथचे वडील तुळशीराम लहाणू कोदे हे रहात होते.

आपल्या भावाच्या घरी रहायला आल्यावर वैशाली आणि अर्जुन हे दोघेही मोलमजुरीसाठी जावू लागले. आपला भार भावावर पडू नये म्हणून दोघेही कामासाठी बाहेर पडत असत. अर्जुन हा नेहमी पत्नी वैशाली हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्याशी भांडण करत असे. त्यावेळी भाऊ सोमनाथ आणि वडील तुळशीराम हे दोघे त्याला समजावून सांगत आणि त्यांच्यातील वाद मिटवत असत, पण एकदा डोक्यात शिरलेले संशयाचे भूत काही केल्या जात नाही. तसेच अर्जुनचे झाले होते. तो वैशालीवर संशय घेण्याचे काही सोडत नव्हता. त्यावरून सतत त्या दोघांमध्ये वाद होत असत. वेळोवेळी भाऊ आणि वडील हे वाद मिटवत असत, पण हे वाद आता मारहाण करण्यापर्यंत येवून पोहोचले होते. अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाणही करत असे.

दि. १६ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता वैशाली व अर्जुन असे दोघे जण तिच्या वडीलांच्या घरी जावून येतो असे भाऊ सोमनाथला सांगून घरातून बाहेर पडले. रात्री ते सोमनाथच्या घरी जेवणासाठी परत येणार होते.रात्री आठ वाजता सोमनाथने वैशालीला फोन केला. तुम्ही जेवायला कधी येता? अशी विचारणा त्याने केली, तेंव्हा तिने आम्ही लगेच येतो असे त्यास सांगितले. इकडे सोमनाथ हाआपल्या बहिणीची आणि भाऊजीची वाट पहात जेवायचा थांबला होता. खूप वेळ निघून गेला तरी ते दोघे आले नाहीत, त्यावेळी सोमनाथ आणि त्याच्या घरच्या लोकांनी विचार केला की ते दोघे वडीलांच्या घरी जेवत असतील, आपणही जेवून घेवूया असे म्हणत त्या सर्वांनी जेवण केले आणि ते झोपी गेले.

दुसरा दिवस उजाडला. वैशाली आणि अर्जुन हे दोघे आले नव्हते म्हणून सोमनाथ हा आपल्या वडीलांच्या घरी गेला. त्याठिकाणी वैशाली आणि अर्जुन हे दोघे दिसतील असे त्याला वाटले, पण घरात ते दोघे दिसले नाहीत म्हणून त्याने वडीलांना विचारले, ‘वैशाली आणि अर्जुन कुठे आहेत?’ तेंव्हा सोमनाथचे वडील म्हणाले, ‘अरे ते दोघे रात्रीच निघून गेले.’

‘बाबा… खरं सांगता ना… रात्री ते घराकडे आलेच नाहीत, म्हणून मी इकडे आलोय…”
“व्हय रे बाबा… रात्रीच गेलेत ते…” सोमनाथच्या वडीलांनी असे म्हटल्यावर सोमनाथला आश्चर्य वाटले. ‘गेले हे कुणीकडं’ असं मनातल्या मनात म्हणत तो तेथेच थांबला. ‘काय हो बाबा कुठं गेले असतील ही दोघं… माझ्याकडं तर ती आली नाहीत. मी वैशालीला आठ वाजता फोन केला होता…” असे तो आपल्या वडीलांना म्हणाला. सोमनाथच्या वडीलांनाही आपल्या मुलीबद्दल आणि जावयाबद्दल काळजी वाटू लागली, ते दोघे नेहमी भांडत असतात. अर्जुन हा वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्याशी वाद घालत असतो… असे विविध विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागले.

मुलीचं आणि जावयाचं नेहमी भांडण होत असतं हे माहित असल्यामुळे त्या दोघांनी आजूबाजूला व परिसरात त्यांचा शोध घ्यायला सुरूवात केली, पण ते दोघेही मिळून आले नाहीत. अखेरीस सोमनाथने वैशालीच्या फोनवर कॉल लावला असता तो लागला नाही. हे सारे शंकास्पद होते, म्हणून सोमनाथ हा गावात जावून त्यांचा शोध घेवू लागला. ते दोघेही कुठेच सापडत नव्हते. सकाळचे ९ वाजले असावेत. सोमनाथ हा बहीण आणि भाऊजीचा शोध घेत आहेत हे गावातल्या काही लोकांना समजले होते. त्यावेळी जसू सिताराम चौधरी याने सोमनाथला फोन करून सांगितले की तुझी बहीण वैशाली अर्जुन पवार ही तुळशीराम चंबार वाघमारे यांच्या फॉरेस्ट प्लॉटमध्ये मृतावस्थेत पडली आहे. वाघमारे यांचा प्लॉट न. २२ हा देशमुखनगर याठिकाणी आहे, तसेच तिच्या पतीने अर्जुन शामल पवार याने साधारण ५० फूट अंतरावर असणाऱ्या सादड्याच्या झाडाला गळफास घेतला आहे.

माहिती मिळताच सोमनाथ हा धावतच घटनास्थळी गेला. त्याठिकाणी वैशाली मृतावस्थेत जमिनीवर पडली होती, तर अर्जुन याने सादड्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेतला होता. सोमनाथने आपल्या वडीलांना फोन लावून ही बाब कळवली. तसेच सरपंच मज्जीत जयराम चौधरी व सावळीराम पांडू महाले यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले.

सोमनाथ व इतरांनी वैशालीजवळ जावून पाहिले असता तिच्या गळ्यावर काळे व्रण दिसत होते. त्यावरून सर्वांना संशय आला की वैशालीचा खून तिचा पती अर्जुन यानेच केला आहे आणि त्यानंतर त्याने गळफास लावून घेतला आहे.

अर्जुन हा नेहमी वैशालीवर संशय घेत असल्याने त्यातूनच त्यानेहे कृत्य केले आहे याची खात्री सोमनाथ आणि त्याच्या वडीलांची झाली. अर्जुन याने वैशालीचा गळा दाबून ती मरण पावल्यावर तिची ओढणी आणि दोरी घेवून ५० फूट अंतरावर असणाऱ्या सादड्याच्या झाडाला गळफास लावून घेतला होता.

या घटनेची माहिती सुरगाणा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ व दोन्ही व मृतदेहांचा पंचनामा केला. सोमनाथ तुळशीराम कोदे याने दिलेल्या फिर्यादीवरून वैशालीचा पती अर्जुन शामल पवार याच्या विरोधात सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. १०६/२०२४ भा.दं. वि. ३०२ कलम खाली गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन याने गळफास घेवून आत्महत्या केल्याने त्याची अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी स्वतः या गुन्ह्याचा तपास आपल्या हाती घेतला. रात्री वडीलांच्या घरातून बाहेर – पडल्यावर रस्त्याने जातांना अर्जुन – याने वैशालीच्या चारित्र्यावर संशय घेवून वाद घालायला सुरूवात केली. दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. यामध्ये अर्जुन हा संतापला आणि त्याने रस्त्यातच वैशालीचा गळा पकडला. आजूबाजूला कोणी नसल्याने त्यांना अडवायला कोणी नव्हते. त्याच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की थोड्याच वेळात वैशाली मरण पावली. ती निपचित झाल्याचे लक्षात येताच अर्जुन याने तिच्या गळ्यावरचा हात काढला आणि वैशाली खाली कोसळली. आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच त्याने वनपट्ट्यातील एका सादड्याच्या झाडाला ओढणी व दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

मृतदेहाचे विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्या दोघांवर गुजरातमधील बिशोनीया गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. चारित्र्याचा संशय घेवून अर्जुन पवार याने पत्नी वैशालीचा गळा दाबून खून केला आणि आपण स्वतः आत्महत्या केल्याने त्यांचा सहा वर्षाचा मुलगा अनाथ झाला आहे. यावेळी अर्जुन याने आपल्या लहान मुलाचा विचार केला नाही.सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व उपनिरीक्षक सुजित पाटील करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button