मोदीच्या सभेतून नवाब मलिकना माघारी पाठवले असते : फडणवीस
मुंबई : देवेंद्र फडणवीस आिण नवाब मलिक यांचे राजकीय वैर सार्वश्रुत आहे. महाविकास आघाडीत असताना नवाब मलिक यांचा इब्राहिम दाऊद गँगशी संबंध असल्याचा आरोप, फडणवीस यांनी केला होता. आता नवाब मलिक हे अजित पवारांसोबत महायुतीत आले आहे. तेव्हा मलिक यांना उमेदवारी देऊ नये म्हणून फडणवीसांनी सांिगतले होते. मात्र, मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री नवाब मलिक यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली असली, तरी भारतीय जनता पक्षाने त्यांच्यापासून अंतर राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला नवाब मलिक यांच्या गैरहजेरीवरुन प्रश्न विचारला असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांना निमंत्रणच नव्हतं, त्यामुळे ते आले असते, तरी त्यांना तसंच परत पाठवून दिलं असतं, असं उत्तर दिलं. परंतु अजितदादांना सर्वांना निमंत्रण होतं, असं म्हणत झाकली मूठ ठेवण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या सभेला मी होतो, पण अजित पवार, एकनाथ शिंदे नव्हते. दुसऱ्या सभेला मी आणि एकनाथ शिंदे नव्हतो, तर अजित पवार होते. पुण्यातील सभेलाही अजित पवार होते, मी आणि शिंदे नव्हतो. आम्ही प्रचाराच्या दृष्टीने सभा वाटून घेतल्या आहेत. पंतप्रधान मोदींचंही हेच म्हणणं आहे, की सर्व जण एकाच ठिकाणी रहाल, तर प्रचार कसा कराल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबईतील सभेची वेगळी गोष्ट असते, पण कोणी नेता किंवा उमेदवार आला नाही, तर त्याचं उत्तर तेच देतील, मी कसं देणार? असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. नवाब मलिक यांना सभेला प्रवेश नाकारला होता का? असा सवाल केला असता, आम्ही नवाब मलिक यांना निमंत्रणच दिलं नव्हतं, तर सभेला येण्यास नकार देण्याचा प्रश्नच येत नाही, असं फडणवीस म्हणाले. निमंत्रण न देता ते येऊ शकत नाहीत, पंतप्रधानांच्या सभेचं व्यासपीठ आहे, बोलावल्याशिवाय ते काय येतील? नाहीतर आले तसे परत पाठवलं जाईल, असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला झिशान सिद्दीकी, सना मलिक का नव्हते? असा प्रश्न विचारला असता, मीही नव्हतो. प्रत्येक उमेदवार नाही जाऊ शकत. निमंत्रण तर सगळ्यांनाच दिलं जातं, असं म्हणत नवाब मलिकांना निमंत्रण होतं, असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. पुण्यातील सभेलाही २१ उमेदवारांना निमंत्रण होतं, मात्र काही जण आपापल्या प्रचारात व्यस्त होते, त्यामुळे येऊ शकले नाहीत, परंतु त्याची अशी चर्चा झाली नाही, असंही अजित पवार पुढे म्हणाले.