नीला नेहमीच करत असे अपमान ! मग शालिकरामने घेतले तिचे प्राण !

अमरावती : संसार सुरू झाला की पहिले काही दिवस मजेत जातात, पण नंतर जगरहाटी सुरू होते. भांड्याला भांड लागल्याशिवाय रहात नाही. काही बायका खूप भांडखोर व हेकेखोर असतात. त्या पतीशी कोणत्याही कारणावरून वाद घालत असतात. एकीकडे दिवसभर काम करून धकलेल्या पतीला पत्नीची चिडचिड नकोसी होते. परिणामी पती-पत्नीत काही वेळा तेढ निर्माण होते. ही कटूता इतकी वाढते की नेहमीच भांडणाऱ्या व अपमान करणाऱ्या पत्नीचे तोंडही पाहू नये असे त्याला वाटते, पण सुटकेचा मार्ग नसल्यामुळे सुटका करून घेण्यासाठी अविचार केला जातो. अमरावती जिल्ह्यात पती-पत्नीत मतभेद वाढले होते. बायको नेहमी अपमान करते याचा त्याला राग होता. याच रागातून त्याने एक दिवस तिचा जीव घेतला. या घटनेचा हा वृत्तांत.
वरूड तालुक्यात वरूडपासून २४ किलोमीटर अंतरावर असलेले एकलविहीर गाव. या गावात शालिकराम धुर्वे (वय ५५) हा व्यक्ती आपल्या कुटुंबासह रहात होता. त्याची पत्नी नीला (वय ५०), मुलगा शेखर (वय २०) आणि मुलगी शुभांगी (वय १८) असे लहान कुटुंब होते. शालिकराम हा गावातील डोरे-गुरे चारायचा. सकाळी गावातील गुरे व बाजूच्या गावातील गाई चरायला जंगलात नेणे, संध्याकाळी गुरे घरी आणून घरामागे बांधणे हा त्याचा नित्यक्रम होता. त्याची पत्नी नीला गावच्या वेशीवरून गुरे आणण्यासाठी दररोज संध्याकाळी त्याला मदत करायची. मुलगा शेखरसुद्धा लिंगा या गावातील गुरे चालत होता. शालिकरामकडे स्वतःच्या चार गाई व चार बकऱ्या होत्या.
शालिकराम हा ढोरा-गुरांमागे जंगलात गुरासारखी मेहनत करायचा, मात्र पत्नी नीला त्याची कवडीचीही किंमत करत नव्हती. सर्व गुरेचराईचे पैसे नीला स्वतःजवळ ठेवायची आणि खर्चासाठी थोडेसे पैसे पती शालिकरामने मागितले तरी त्याला शिवीगाळ करत अपमानित करायची. कोणासमोरही काहीही त्याला नीला बोलत असल्याने शालिकरामचा अपमान व्हायचा. गेल्या दहा वर्षापासून तो अपमानच सहन करत होता. गुरांमध्ये राबराब राबून गुरासारखेच आयुष्य शालिकरामचे झाले होते. हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे असेच त्याला वाटत होते, पण पत्नी नीला भांडखोर असल्याने व त्याच्याशी दररोज वाद करत असल्याने प्रकार थांबण्याऐवजी अधिक वाढत होता. दि. ८ जुलै रोजी नीलाने पती शालिकराम याच्यासोबत वाद घालून त्याचा अपमान केला. पत्नीने केलेला अपमान शालिकरामच्या चांगलाच जिव्हारी लागल्याने तिला संपवण्याचा पक्का विचार करूनच तो ९ जुलै रोजी झोपेतून उठला. सकाळी आपली कामे उरकून जेवणाचा डबा घेऊन सर्व गुरे चरण्यासाठी जंगलाकडे निघाला, तेंव्हा त्याने पत्नी नीलास गुरे वळवण्यासाठी गावच्या वेशीवर येण्या ऐवजी जंगलात ये असे सांगून गुरे चारण्यासाठी जंगलात निघून गेला. ठरल्याप्रमाणे पाच ते सहा वाजता दरम्यान नीला जंगलाकडे गुरे आणायला गेली. दिवसभर गुरे चारत असतांना शालिकरामने आज पत्नीला संपवले पाहिजे असा निश्चय केला होता. नीला जंगलात गुरे आणायला आली असता शालिकराम व तिच्यात परत वाद झाला. शिवीगाळ करत असतांना शालिकरामने तिच्या कानशिलात चार-पाच लगावल्या आणि रागाने लालबुंद होत तिच्याच साडीने तिचा ताकदीने गळा आवळला. गळा आवळला गेल्याने ती टाचा घासत बेशुद्ध पडली.
बेशुद्ध नीलास खांद्यावर घेऊन काही अंतरावर मोहफुलाच्या झाडाखाली टाकून दिले. काही अंतरावर तिची काठी आणि चपला पडल्या होत्या, त्या घेऊन शालिकराम गावात आला. गावात गुरे बांधून त्यांना पाणी वगैरे पाजून गावातून तो एक धारदार कुन्हाड घेऊन जंगलात गेला. नीला जिवंत असावी असे वाटल्याने त्याने जंगलात तिच्याजवळ जाऊन धारदार कु-हाडीचे वार तिच्या मानेवर घातले. त्यानंतर कुऱ्हाड घेऊन तो घरी आला. कुऱ्हाड व रक्ताचे कपडे लपवून तो पत्नीस शोधण्याचे नाटक करू लागला. रात्री १२ वाजेपर्यंत त्याने गावकरी व नातेवाईक यांच्यासह जंगलात दुसरीकडे शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी पत्नीस जंगलात जनावरांनी मारून टाकले असावे असे म्हणून रडून नाटक करू लागला. दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडल्यावर तिथेही शालिकराम रडण्याचे नाटक करू लागला.
दि. १० जुलै बुधवारचा दिवस. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान वरूड पोलीस स्टेशनचे कर्मचारी कामात व्यस्त होते. त्यावेळी पोलीस स्टेशन हद्दीतील एकलविहीर गावातील काही नागरिक पोलीस स्टेशनला आले. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले की, गावातील नीला धुर्वे ही महिला काल संध्याकाळपासून गायब होती, तिची शोधाशोध केली असता आज सकाळी जंगलात तिचा मृतदेह सापडला आहे म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला माहिती देण्यासाठी आलो. नागरिकांच्या माहितीवरून वरूड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एकलविहीर गावाजवळील काही अंतरावरील जंगलात नीला धुर्वे या महिलेचा मृतदेह एका झाडाखाली पडलेला होता. तिच्या गळ्यावर खोल धारदार शस्त्राचे घाव दिसत होते, तर गळ्याभोवती साडी आवळलेली होती. पोलिसांनी फिंगरप्रिंट एक्सपर्ट व श्वान पथकास पाचारण केले. स्थानिक गुन्हा अन्वेषण. शाखेची टीमसुद्धा घटनास्थळी पोहोचली. पाऊस पडलेला असल्यामुळे श्वान मार्ग दाखवू शकला नाही. फिंगरप्रिंट एक्सपर्टनी काही नमुने गोळा केले.
पोलिसांनी घटनास्थळावर मात्र या महिलेचा मृत्यू जंगलातील काही पुरावा सापडतो का? याचा प्राण्यांच्या हल्ल्यात झाला की शोध घेतला असता पोलिसांना आणखी कशामुळे? असा प्रश्न कोणताही धागा मिळाला नाही, पडला होता. मृतकाचा गळ्यावर असलेले व्रण तीक्ष्ण हत्याराचे असल्याने हा घातपात असावा असा संशय पोलिसांना होता मात्र ठोस निष्कर्ष काढता येत नव्हता. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा व इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी वरूड रुग्णालयात पाठवला. पोस्टमार्टम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा आवळल्याने व नंतर हत्याराने गळा चिरल्याने नीलाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अभिप्राय दिला, त्यामुळे नीला धुर्वे या महिलेची हत्या झाल्याची पोलिसांची आता पक्की खात्री पटली.
दि. ११ जुलै रोजी मृतकच्या संपर्कातील सर्वांचे जाब-जबाब नोंदवत असतांना पोलिसांना नीलाचा पती शालिकराम याच्या जबाबात खूप तफावत आढळली. तसेच पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देतांना त्याचे हावभाव बदलत असल्याने शालिकराम याच्यावर पोलिसांचा संशय बळावला.. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेत विचारणा केली असता शालिकराम याने आपणच पत्नीचा खून केल्याचे पोलिसांजवळ कबूल केले. दुसऱ्या दिवशी दि. ११ रोजी स्थानिक न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत त्याने नेहमीच अपमानजनक वागणूक देणाऱ्या पत्नी नीलाचा रागाच्या भरात कसा खून केला ते पोलिसांना सांगून टाकले.
या घटनेचा तपास अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, वरूड पोलीस स्टेशन ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक नितीन इंगोले, नितीन चुलपावर, पोलीस अंमलदार राजू मडावी, गजेंद्र ठाकरे, सचिन मिश्रा, बळवंत दाभने, शकील चव्हाण, रवींद्र बावणे, भूषण पेटे, पंकज फाटे, राजू चव्हाण, मंगेश मानमोडे करत आहेत.