शेजारिणीने दिली लैंगिक छळाची धमकी, वृद्धाची आत्महत्या
मुंबई : शेजारी राहणाऱ्या विवाहिताने लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. यास कंटाळून ६७ वर्षीय वृद्धाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याने त्या विवाहितेस अटक करण्यात आली आहे.
कुमकुम मिश्रा असे त्या महिलेचे नाव आहे. खुशाल दांड असे आत्महत्या करणाऱ्या व्रध्दाचे नाव आहे. कुमकुम मिश्रा ही दांड यांना सतत धमक्या आणि अपमानास्पद वागणुक देत होती. त्यातून त्यांना कठोर पाऊल उचलण्यास प्रवृत्त केल्याचा दांड कुटुंबीयांचा आरोप होता. कुटुंबियांच्या तक्रारीवरून मुलुंड पोलिसांनी एक सप्टेंबर रोजी कुमकुमला दांड यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत अटक केली. गेल्या आठवड्यात अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही एम सुंदळे यांनी तिची जामिनावर सुटका केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलुंड येथील मनिषा प्राईड को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणारी ४५ वर्षीय कुमकुम मिश्रा आणि त्याच इमारतीच्या १९ व्या मजल्यावरील रहिवासी खुशाल दांड यांच्यात पार्किंगच्या जागेवरून वाद होता. दांड हे एलआयसी एजंट म्हणून काम करत होते. दांड कुटुंबाकडे गाडी नसल्याने दुरुस्ती काळात मिश्रा कुटुंब दांड यांचा पार्किंग स्लॉट तात्पुरता वापरत होते, मात्र तो कायमस्वरुपी देण्याची मिश्रांची मागणी होती.
५ ऑगस्ट रोजी कुमकुम मिश्रा आणि खुशाल दांड हे लिफ्टमध्ये आमनेसामने आले. यावेळी तिने दांड यांना खोट्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अडकवण्याची आणि इमारतीच्या बाहेर काढण्याची धमकी दिली. दांड यांना पेसमेकर होता. त्यांना छातीत तीव्र वेदना आणि अँक्झायटी अटॅक येत असत.
मिश्रा आणि दांड यांच्यातील वादाविषयी पोलिसांनी सांगितले की, चौथ्या मजल्यावरील पार्किंग स्पेसच्या दुरुस्तीमुळे मिश्रांना दांड कुटुंबाची पार्किंगची जागा तात्पुरती वापरण्यास देण्यात आली होती. दांड यांच्याकडे स्वत:ची गाडी नसल्यामुळे त्यांच्या नावाची पार्किंगची जागा रिकामी होती.
घटनेच्या आठवडाभरापूर्वी, कुमकुम मिश्राने दांड यांनी त्यांची पार्किंगची जागा कायमची सोडण्याची मागणी केली. ५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ट्रेन उशिरा आल्याने दांड घरी परतले तेव्हा परिस्थिती आणखी चिघळली. लैंगिक छळाच्या खोट्या प्रकरणात गुंतवून बिल्डिंगबाहेर काढण्याची धमकी कुमकुमने दिल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे.
सात ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास दांड नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी घरून निघाले. ते बराच उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचे मेहुणे उल्हास मोमाया यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. नंतर त्यांना रेल्वे पोलिसांकडून कळले की मुलुंड स्टेशनजवळ पहाटे ५.३४ वाजताच्या सुमारास दांड यांना लोकल ट्रेनने धडक दिली.
मोटरमन बेनी मोझेस केनेडी यांच्यासह प्रत्यक्षदर्शींनी जबाब दिला, की खुशाल दांड रुळांवर बसले होते. ट्रेनचे आपत्कालीन ब्रेक लावले जात असतानाही, धडकेपासून वाचण्यासाठी ते वेळीच दूर सरले नाहीत.