नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी घेतला पदभार

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलाचे आदेश नुकतेच शासनाच्या वतीने काढण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांचा कार्यकाळ संपल्याने त्याची देखील बदली करण्यात आली. त्यांच्याजागी ठाणे येथून डॉ. विनयकुमार राठोड (भापोसे ) यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, सोमवार, १२ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षकपदाचा राठोड यांनी कलवनिया यांच्याकडून पदभार स्वीकारला.
यावेळी राठोड यांनी पोलीस अधीक्षक ग्रामीण दलाची माहिती देखील जाणून घेतली. दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर विनयकुमार राठोड यांनी ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सध्याच्या कामकाजाची माहिती घेतली. दरम्यान, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या कार्यकाळात पोलीस भरती निर्विघ्नपणे पार पडली. तसेच वेगवेगळे उपक्रम आणि कारवाया सातत्याने ग्रामीण पोलिसांकडून केल्या जात असल्याने आणि प्रतिबंधात्मक कारवाया देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने गुन्हेगारांना पोलिसांची चांगलीच धास्ती बसलेली मनीष कलवानिया यांच्या कार्यकाळात दिसून आले. यापुढे नवनियुक्त पोलीस आयुक्त विनयकुमार राठोड यांच्या कामाची पद्धती देखील कडक शिस्तीची असल्याने ग्रामीण भागात पोलिसांचा धाक आणि दरारा कायम राहणार असल्याचे दिसून येत आहे.