क्राइममहाराष्ट्र
ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या पर्समधून पावणेनऊ लाखांचा ऐवज लंपास
सांगोला पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

सांगोला : प्रतिनिधी
पाहुण्याच्या लग्नासाठी नागपूर येथून मूळगावी तासगाव येथे जाण्यासाठी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या सोने- चांदीच्या व्यापाऱ्याच्या पत्नीच्या पर्समधील सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने व सुमारे ३९ हजार रोख रक्कम असा एकूण ८ लाख ७४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीस गेला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दिनांक १० जुलै रोजी बाबासाहेब जाधव रा. मायाक्का मंदिरजवळ वरची गल्ली, बायपास रोड, तासगाव सध्या रा. खंडोबा मंदिराजवळ चांदणी चौक, सुभाष रोड, नागपुर यांनी अज्ञात चोरट्याविरोधात सांगोला पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे सोने- चांदीचा व्यापार करतात. दिनांक ९ जुलै रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे सैनी ट्रॅव्हल्सने नागपुरहून मुळगावी पाहुण्यातील लग्नकार्य असल्याने तासगाव जि. सांगली येथे जाण्यासाठी पत्नीसह निघाले होते. लग्न कार्य असल्याने फिर्यादी यांनी सोन्याचे दागिने सोबत घेतले होते. रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास जेवणाकरता सदरची ट्रॅव्हल्स जवळा ता. आर्णी जि. यवतमाळ येथील गुरुनानक हॉटेल येथे थांबली होती. त्यावेळी फिर्यादी यांनी दागिन्याची पर्स सोबत घेवून जेवणाकरत थांबले होते, जेवणखाण करून सदरची ट्रॅव्हल्स कोल्हापुर येथे जाणेकरता निघाली. फिर्यादी हे दागिन्यांची पर्स जवळच ठेऊन ट्रॅव्हल्समध्ये झोपी गेले.
हदगाव जि. यवतमाळ येथील मल्लीनाथ हॉटेल येथे लघुशंकेकरीता ट्रॅव्हल्स थांबली. त्यावेळी फिर्यादी हे खाली उतरुन पुन्हा गाडीत जाऊन बसले. परत रात्री तीन वाजण्याच्या सुमारास आष्टा टोलनाक्याजवळ ट्रॅव्हल्स थांबल्यावर फिर्यादी हे लघुशंकेकरीता खाली उतरुन परत गाडीत बसले. त्यानंतर ट्रॅव्हल्स तुळजापुर व सोलापुर येथे आल्यावर तेथे काही प्रवाशी उतरले.
सांगोला- सोलापूर रोडवरील मौजे वाढेगाव ता. सांगोला शिवारातील हॉटेल राजापुरी येथे दिनांक १० जुलै रोजी पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास चहासाठी ट्रॅव्हल्स थांबली, त्यावेळी पर्स ट्रॅव्हल्स मधील सीटवर ठेवून फिर्यादी व पत्नी खाली उतरले. चहाचे कमी पडलेले पैसे देण्यासाठी फिर्यादी यांच्या पत्नी यांनी पैसे घेण्यासाठी परत ट्रॅव्हल्समध्ये गेल्यावर पर्स उघडली असता, पर्स मधील सुमारे ८ लाख ३५ हजार रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने व सुमारे ३९ हजार रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्ष्यात आले, असे पोलीसात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले.