भाजपाला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली : पटोले
अकोला : विधानसभा निवडणुकीचा प्रचार चांगला रंगला आहे. प्रत्येक पक्षाचे मोठे नेते हे उमेदवारासाठी प्रचारसभेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करत आहे. याच प्रचारसभेतून एकमेकांवर टीकास्त्र उगारण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेला संबोधित करताना हे विधान केले आहे. भाजपबद्दल बोलताना पटोले यांनी ही जहिरी टीका केली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार साजिद खान मन्नन खान यांच्या प्रचारसभेत पटोले यांनी ओबीसी समुदायातील लोकांना उद्देशून म्हटले की, “भाजपाला आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे.”
सभेत बोलताना नाना पटोले यांनी, “इथे ओबीसी समुदायातील लोक देखील बसले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे की अकोला जिल्ह्यातील ओबीसी समुदायातील लोक भारतीय जनता पार्टीला मतदान करणार आहेत का? कारण हेच लोक तुम्हाला कुत्रा बोलतात. त्यामुळे आता भाजपाला कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. यांना इतकी मस्ती आली आहे की हे आता स्वतःला देव संबोधू लागले आहेत”.असे त्यांनी म्हटले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांना पूर्वीपासून लोक देवेंद्र फडणवीस याच नावाने ओळखतात. मला सर्वजण नानाभाऊ म्हणतात. आधी म्हणत होते, आताही म्हणतात आणि पुढेही म्हणतील. तुम्ही सर्वजण मला नानाभाऊ या नावानेच हाक मारता. फडणवीसांना सगळेजण देवेंद्र फडणवीस अशी हाक मारायचे. मात्र, आता त्यांनी स्वतःचं नाव बदललं आहे. ते स्वतःला देवा भाऊ असं संबोधू लागले आहेत. पुढील काही दिवसांत ते त्यांच्या नावापुढचा भाऊ हा शब्द काढतील. त्यानंतर काय राहील?” यावर सर्वांनी ‘देवा’ असं उत्तर दिलं. त्यावर नाना पटोले म्हणाले, “एक विश्वगुरू दिल्लीमध्ये बसले आहेत, दुसरे महाराष्ट्रात तयार होत आहेत”.