…आता जितेंद्र आव्हाडांनी दादांच्या गाईचा गोठा साफ करावा: मिटकरी
मुंबई : विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यात चांगलाच आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत होत्या. या दोन्ही आमदारांनी एकमेकांना चॅलेंजही दिलं होतं. आता निवडणूक निकालानंतर अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाडांना डिवचलं आहे. त्यांनी जितेंद्र आव्हाडांना आपलं चॅलेंज पूर्ण करा म्हणत निवडणूकपूर्व झालेल्या वादाची आठवण करुन दिलीय.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार जर बारामती मतदारसंघातून पडले तर मी आयुष्यभर जितेंद्र आव्हाड यांचा गुलाम म्हणून कळवा मुंब्रात काम करेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं होतं. मात्र, अजित पवार निवडून आले तर जितेंद्र आव्हाड यांनी रोज सकाळी ८ वाजता वर्षा बंगल्यावर पाणी भरायला यायचं असा टोला देखील मिटकरी यांनी लगावला होता. तसेच, एक लाखांच्या मतांच्या फरकाने अजित पवार जिंकले किंवा दादा विजयी झाले तर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या घरी घरगडी म्हणून राहावे आणि अजित पवार पराभूत झाले तर मी आव्हाडांच्या घरी घरगडी म्हणून कामाला जाईल’, असं खुलं चॅलेंज अमोल मिटकरींनी दिलं होतं. आता, अजित पवार यांनी १ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळवला आहे. त्यामुळे, मिटकरी यांनी ट्विट करुन पुन्हा जितेंद्र आव्हाड यांना डिवचलं आहे. ”डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि चॅलेंज पूर्ण करावे.”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
दरम्यान, अजित पवार मुख्यमंत्री होतील, कारण आमच्या ३५ जागा निवडून येतील. स्ट्राईक रेटवर आम्ही मुख्यमंत्रीपद घेऊ असा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला आहे.
डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी काल चॅलेंज दिलं होतं ते आज त्यांनी पूर्ण करावं! बारामती दादांचीच हे सिद्ध झाले आहे. प्रमाणपत्र घेतल्यावर सरळ बारामतीला जाऊन दादांच्या गाईचा गोठा साफ करावा आणि चॅलेंज पूर्ण करावे..@Awhadspeaks
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) November 23, 2024