या दिवशी आणि या ठिकाणी होईल महायुतीचा शपथविधी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तरी मुख्यमंत्रीपदाचा पेच काही सुटला नाही. त्यामुळे महायुतीचा शपथविधीची तारीखही ठरली नव्हती. मात्र आता महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची तारीख आणि ठिकाण ठरले आहे.
महायुतीचा शपथविधी सोहळा पाच डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत 132 जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. मात्र यामुळे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
निवडणुकीत महायुतीचे 288 पैकी 236 जागांवर उमेदवार निवडून आले आहेत. यात भारजीय जनता पक्षाच्या 132 जागा निवडून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या खालोखाल शिंदेंच्या शिवसेनेच्या 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या आहेत.