…. नाही तर राजकीय संन्यास घेईल : शहाजीबापू पाटील
सांगोला : विधानसभा निवडणूकीत सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत.
पराभवानंतर प्रथमचे शहाजीबापू थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. काल मुंबई येथून परत येताच त्यांनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीला इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्याने याचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
पराभव काय पहिल्यांदा होत आहे का? असा सवाल कार्यकर्त्यांना करून मी यामुळे खचायला काय भिताड किंवा पूल आहे का? असे सांगत शहाजीबापू यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवला. उद्धव ठाकरे आणि भोंगा संजय राऊत इथे काय त्यांच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी नाही, तर मला पाडायला आले होते असा घणाघात देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी केला. मी भाषणात महायुतीला 200 पेक्षा जास्त जागा मिळणार म्हणून सांगत होतो आणि संजय राऊत आम्ही सत्तेत येणार अशी बडबड करीत होते. संजय राऊत कुणाकुणाला तुरुंगात टाकायचं याची यादी करून वाट बघत होते. तू तुरुंगात जाऊन आला म्हणून काय सगळं महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे म्हणतोय, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.
ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, दोन वर्षात 5 हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे.
आमदारकीपेक्षा मोठं काहीतरी घेऊन येतो, तुम्ही रुबाबात राहा- शहाजीबापू पाटील
पराभवाने खचू नका…माझ्यावर विश्वास ठेवा, या आमदारकी पेक्षा मोठे कायतर घेऊन येऊन दाखवतो, असे सांगत दोन महिन्यात यापेक्षा जास्त रुबाबात राहा असे शहाजीबापू पाटील यांनी सांगितले. आता येणाऱ्या सगळ्या निवडणुकात गुलाल आपल्यालाच घ्यायचा असून यावेळी चुकीच्या पद्धतीने प्रचार केल्याने आपला पराभव झाल्याचे त्यांनी सांगितले.
सांगोला अनेक दशके शेकापचा बालेकिल्ला !
सांगोला हा मतदारसंघ पूर्वीपासून शेकापचा बालेकिल्ला होता. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी 13 विधानसभा निवडणूका लढवून, तब्बल 11 वेळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले होते.
खुद्द शहाजीबापुंनी देशमुखांविरोधात 6 वेळा निवडणूक लढविली होती. पण तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 2019 ला गणपतराव देशमुख यांचे वय झाल्याने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी शेकाप कडून निवडणूक लढवली, त्यामुळे शहाजीबापू पाटील यांना संधी चालून आली होती. 2019 च्या निवडणुकीत शहाजी पाटलांचा विजय झाला होता.
यंदाच्या तिरंगी लढतीत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी 1 लाख 16 हजार 280 मते घेत, शहाजी बापू पाटील यांचा 25 हजार 384 मतांनी पराभव केला. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा एकदा सांगोला मतदारसंघात शेकापचेच वर्चस्व असल्याचे सिद्ध केले आहे.