रेकॉर्डवरील नशेखोरांची पोलीस आयुक्तालयात परेड
छत्रपती संभाजीनगर शहरातील ८९ नशेखोरांना दिली एमपीडीए, मोक्काची तंबी
छत्रपती संभाजीनगर : वाढत्या नशेखोरीला आळा घालण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील आरोपींची सोमवारी (दि. ५) पोलिस आयुक्तालयात परेड काढण्यात आली. १७ ठाण्याच्या हद्दीतून सुमारे ८९ नशेखोरांना येथे हजर करण्यात आले. यावेळी सर्वांना कडक शब्दात तंबी देण्यात आली. नशेखोरी रोखण्यासाठी या गुन्ह्यातील आरोपींवर मोठ्या प्रमाणात एमपीडीए आणि मोक्कासारख्या प्रभावी कारवाया केल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गुन्ह्यात ग्राहक, विक्रेता आणि पुरवठादार यांना आरोपी केले जात असून त्यांना अटकही केली जात आहे. भविष्यात प्रभावी कारवाई करण्यासाठी प्रत्येक गुन्ह्यात आरोपींची सप्लाय चेन उघड करण्यावर पथकाचा भर राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली. यावेळी सहायक आयुक्त धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, अमली पदार्थ प्रतिबंध शाखेच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरात नशेखोरीतून गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी नशेखोरी रोखण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. अमली पदार्थ प्रतिबंधक शाखा स्थापन करून जोरदार कारवाया सुरू केल्या असून अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या आणि नशा करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये योग्य संदेश जाण्यासाठी पोलिस आयुक्तालयाच्या मुख्यालयात एनडीपीएस गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. मागील तीन ते चार वर्षांत अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यात रेकॉर्डवर आलेल्या आरोपींना गुन्हे शाखा आणि डीबी पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजर केले. दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना परेडसाठी हजर करण्यात आले. उपायुक्त (गुन्हे) प्रशांत स्वामी, सहायक आयुक्त धनंजय पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक संदीप गुरमे, अमली पदार्थ विरोधी पथकाच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी हजर आरोपींची परेड घेतली.
नशेखोरी, गुन्हेगारीतून बाहेर पाडण्यासाठी मदत पण…..
- आरोपींना आतापर्यंतच्या गुन्ह्याची माहिती देत यापुढे गुन्हा केल्यास कडक कारवाईचा इशारा
- नवीन गुन्ह्यात आढळल्यास जुन्या गुन्ह्यातील जामीनही रद्द करण्याची प्रक्रिया करणार
- गुन्ह्यात लहान मुलांचा वापर केल्यास ज्युवेनाईल जस्टीस कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हे दाखल करणार
- एनजीओच्या माध्यमातून आरोपींना सहकार्य करून गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यासाठी मदत करणार
- नागरिकांनी ९५२९०१९०६१ या क्रमांकावर नशेखोरांची माहिती द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले
सर्वांची माहिती केली अद्यावत
परेडसाठी हजर करण्यात आलेल्या सर्व आरोपींचे नाव, मोबाइल क्रमांक, नातेवाईकांची नावे, त्यांचे मोबाइल क्रमांक, पत्ता, जवळच्या नातेवाईकांचा पत्ता, किती गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती असलेला फॉर्म भरून घेण्यात आला. सर्व आरोपींचे समोरून आणि दोन्ही बाजुने चेहऱ्याचे फोटो काढण्यात आले. आरोपींची वैयक्तिक माहिती आणि फोटोंचे रेकॉर्ड अद्यावतपणे तयार केले आहे. यापुढे आढळून आला तर त्याला थेट हर्सुलला पाठविण्याची तयारीच पोलिसांनी केली आहे.