बळजबरीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीवर पोलिसांची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य चौकात सिग्नलवर थांबलेल्या वाहनचालकांकडून बळजबरी पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सेव्हन हिल उड्डाणपुलाखाली आणि सिडको चौकात ५ आणि ६ आॅगस्टला ही कारवाई करण्यात आली. चौघांना ताब्यात घेऊन या प्रकरणी जिन्सी ठाण्यात चौघांविरुद्ध तर सिडको ठाण्यात दोन तृतीय पंथीयांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नवनीत काँवत यांनी दिली.
कली ऊर्फ कविता रामा शिंदे (३०, रा. केम्ब्रिज नाका, मुकुंदवाडी) आणि छाया वर्मा ऊर्फ संजू तांबू वर्मा (४५, रा. इंदिरानगर, बायजीपुरा) अशी सिडकोतील तर, संगिता शेख निकिता (२३, रा. सूतगिरणी, काबरानगर), अमृता जाधव निकिता (३८, रा. बाळापूर फाटा), सोफिया शेख आलिया शेख (२५, रा. शिवाजीनगर) आणि काव्या शेख आलिया शेख (२५, रा. धरतीधन सोसायटी, शिवाजीनगर), अशी जिन्सी ठाण्यातील तृतीयपंथी आरोपींची नावे आहेत.
शहरातील दर्गा चौक, क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिल उड्डाणपूल, गजानन महाराज मंदिर चौक, सिडको चौक, नगर नाका, मुकुंदवाडी चौक, केम्ब्रिज चौक आदी महत्त्वाच्या आणि मोठ्या चौकांमध्ये सिग्नल लागताच तृतीयपंथी वाहनाजवळ जातात. पैशांची मागणी करतात. समोरच्याने पैसे देण्यास नकार दिला तरी त्याला बळजबरी पैसे मागतात. चारचाकीवाल्यांची तर अक्षरश: अडवणूक करतात. हे प्रकार मागील काही दिवसांपासून वाढल्यामुळे उपायुक्त नवीनत काँवत यांनी अशा भिक्षेकऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले. त्यावरून जिन्सी ठाण्यातील अंमलदार संतोष शंकपाळ, पवार, इम्रान, महिला अंमलदार गवळी यांनी सेव्हनहिल उड्डाणपुलाखाली चार तृतीयपंथीयांना पकडले. ते वाहनचालकांना बळजबरी पैसे मागताना आढळून आल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. त्याच पद्धतीने सिडको ठाण्याचे निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक पठाण, महिला उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे, तडवी यांच्यासह अंमलदार पंडित राजपूत, हांडके यांनी सिडको चौकात कारवाई केली. तेथे दोन तृतीयपंथीयांना वाहनचालकांकडून पैसे घेताना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध मुंबई भिक मागण्यास प्रतिबंध कायदा कलम ४ अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
..तर खंडणीचा गुन्हा दाखल होऊ शकतो
वाहनधारकांकडून चौकात बळजबरी पैशांची मागणी केली जात असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधवा. आता जिन्सी आणि सिडको पोलिसांनी सेव्हनहिल उड्डाणपूल आणि सिडको चौकात कारवाया करून सहा तृतीयपंथीयांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापुढेही असे प्रकार दिसून आले तर कडक कारवाई केली जाईल. दमदाटी करून पैसे मागितल्यास खंडणीचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे.
– नवनीत काँवत, उपायुक्त, परिमंडळ २