राज्यातील पोलीस दलास मिळणार नवी वाहने; गृह विभागाची खरेदीस मंजुरी

मुंबई : राज्य गृह विभागाने पोलीस दलासाठी ५६६ कोटींची २२९८ वाहने खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. या वाहनांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसाठी वाहने, पाणीफवारा करणारी ‘वरुण’, कंट्रोल व्हॅन, वॉटर टँकर सह श्वानांच्या एसी वाहनांचा समावेश आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने वाहनांच्या कमतरतेची स्यू-मोटो दखल घेत, वाहनखरेदीला तातडीने मान्यता देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. त्यानुसार, या वाहनांची खरेदी होणार आहे.
नालासोपाऱ्यातील तुळींज पोलीस ठाण्यातून आरोपींना न्यायालयात तसेच तुरुंगात नेण्यासाठी रिक्षाचा वापर केल्याचे वृत्त २०२३मध्ये एका वृत्तपत्राने दिले होते. या वृत्ताची स्यू-मोटो दखल घेत राज्य मानवी हक्क आयोगाने राज्य सरकारला याविषयी विचारणा केली. त्यावर पोलीस महासंचालक कार्यालयाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात, राज्यभरात (मुंबई वगळून) २२९८ वाहनांची कमतरता असल्याचे मान्य करत खरेदीची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद केले होते. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के.के. तातेड यांनी, ही वाहन खरेदी लवकरात लवकर करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक कार्यालय आणि राज्य सरकारला दिले होते.
राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार गृह विभागाने ही वाहने विकत घेण्यास मंजुरी दिली आहे. २०२४ ते २०२८ या चार वर्षांदरम्यान या वाहनांची खरेदी होणार आहे. या सर्व वाहनांच्या खरेदीमुळे राज्याच्या तिजोरीवर ५६६.७८ कोटी रुपयांचा भार पडणार आहे. वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार, पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना १२ लाख रुपये किंमतीचे, तर पोलिस अधीक्षक व त्यावरील अधिकाऱ्यांसाठी ९ लाख रुपये किमतीचे वाहन घेण्यास परवानगी असेल. या वाहनांच्या खरेदीचा आढावा पोलीस महासंचालक कार्यालयाने घ्यावा व त्याविषयीचा अहवाल वेळोवेळी सरकारला सादर करावा, असे निर्देशही गृह विभागाने दिले आहेत.
या वाहनांची होणार खरेदी
पोलीस अधिकाऱ्यांसाठी वाहने (७१), पिक अप व्हॅन (१६६०), एसी डॉग व्हॅन (१७), ट्रक (१२५), वॉटर टँकर (२८), बस (२६२), वरुण (७०), आरआयव्ही (५६), कंट्रोल व्हॅन (५) यांचा समावेश आहे.