परधर्मीयासोबत लग्न करुन मुलगी झाली पसार… तिच्या सासऱ्याला ठार करून भाऊ झाला फरार

पुणे : कठाळू कचरूया लहाडे (वय ६०) हे सद्गृहस्थ स.नं. ११५ राजीव गांधीनगर मेटर कॉर्नर आळंदी रोड येरवडा, पुणे ६ या ठिकाणी रहात होते. त्यांना दोन पत्नी होत्या. एका पत्नीचे नाव विजयमाला तर दुसरीचे नाव रूक्मिणी असे होते. त्या दोघीही शेजारी- शेजारी वेगवेगळ्या रूममध्ये रहात होत्या. विजयमाला यांच्याजवळ त्यांचा मुलगा धम्मकिरण (वय २५) त्यांच्या मुलीचा मुलगा रोहित (वय १३), मुलीची मुलगी अमृता (वय १७) असे एकत्रित रहात होते. रूक्मिणी ही तिचा मुलगा योगेश (वय २४) हे दोघेच रहायचे तर रूक्मिणी यांची मुलगी कल्पना ही हडपसर येथे रहात होती. कठाळू लहाडे हे घरीच असायचे. त्याचा मुलगा धम्मकिरण हा अजंठा मेडीकल आळंदी रोड येरवडा पुणे याठिकाणी मेडीकल कामगार म्हणून काम करत होता. कठाळू हे कुठलाच काम-धंदा करत नसल्यामुळे धम्मकिरण हा मेडीकलमध्ये काम करून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करत होता. कठाळू लहाडे यांच्या दुसऱ्या पत्नीचा मुलगा योगेश याचे याच परिसरात रहाणाऱ्या मुस्लीम समाजामधील. मुस्कान नावाच्या मुलीबरोबर प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. मुस्कानने ही गोष्ट आपल्या घरच्या मंडळींना सांगितली.
योगेश आणि मी प्रेमविवाह करणार असल्याचे तिने सांगितले, परंतु मुस्कानच्या घरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता, तर मुस्कान आपल्या घरच्या मंडळींचा विरोध झुगारून योगेशबरोबर काही दिवसांपूर्वीच प्रेमविवाह केला. ते दोघे त्यानंतर पुण्याच्या बाहेर पळून गेले. मुस्कानचा भाऊ ईस्माईल हा खुनशी प्रवृत्तीचा आहे. तो निश्चितच हीतरी बरे-वाईट करेल म्हणून मुस्कानने योगेशला सांगितले. ते दोघेही घरच्या मंडळींना न सांगता घराबाहेर पडले होते. असाच काही दिवसांचा कालावधी निघून गेला.
दि. २४ जूनं २०२४ चा दिवस होता. साधारणपणे सकाळी दहा वाजण्याचा सुमार असावा. योगेशचा सावत्र भाऊ धम्मकिरण हा अजंठा मेडीकल या ठिकाणी कामावर जाण्याकरता घरातून चालत निघाला. साधारणतः दहा वाजून दहा मिनिटे झाली असावीत. तो मेडीकलमध्ये नेहमीसारखे काम करू लागला. पंधरा-वीस मिनिटात साधारणपणे साडेअकराची वेळ असावी. या दरम्यान योगेशने धम्मकिरण याच्या मोबाईलवर फोन केला, त्याने बोलण्यास सुरूवात केली की, ‘पप्पांना सांग की रात्रीचे बाहेर मैदानात झोपत जाऊ नका व बाहेर बसत जाऊ नका. मी सांगितले आहे असे सांग. तसेच आपला भाचा रोहित याला दहा दिवसांसाठी धानोरी येथे बहीण कोमल हिच्याकडे पाठवून दे. तसेच मुस्कान ही माझ्यासोबत आहे. आपल्या घरी पोलीस आले तर त्यांना घरामध्ये असलेल्या बास्केटमधील माझ्या व मुस्कानच्या लग्नाची कागदपत्रे असलेली पिशवी दे.’ त्यावर धम्मकिरणने विचारले, ‘तू असे का बोलतोस ?’ त्यावर योगेश म्हणाला, ‘मुस्कान ही माझ्याबरोबर आहे, त्यामुळे तिचा भाऊ ईस्माईल हा तुम्हाला काहीतरी करेल असे मला वाटतेय. मी व मुस्कान आता काही घरी येणार नाही. तसेच कोणी भाडेकरू खोलीसाठी आला तर त्यांना लॉक – तोडून खोली भाड्याने दे.’ असे सांगून त्याने फोन ठेवून दिला.
त्यांनंतर थोड्या वेळाचा कालावधी निघून गेला. साधारणपणे दुपारी एक-सव्वा एक वाजण्याचा सुमारास धम्मकिरण हा दुपारच्या जेवणासाठी घरी जेवण करण्यासाठी आला होता. त्यावेळी वडील कठाळू हे घराच्या बाहेर झाडाखाली उभे होते. योगेशच्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते.
धम्मकिरण घरी आल्यावर त्याने हात-पाय धुतले आणि आपली आई विजयमाला हिला म्हणाला, ‘आई, मला जेवायला वाढ’ ते दोघे माय-लेक जेवायला बसले होते. या दरम्यान धम्मकिरण आपल्या आईस योगेशने केलेला फोन सांगितला. योगेशने मुस्कान नावाच्या मुलीबरोबर प्रेमविवाह केल्याचेही सांगितले. तसेच वडीलांना रात्रीच्यां वेळी घराबाहेर झोपून देऊ नको असेही सांगितले.
ते दोघे याविषयावर चर्चा करत असतांना काही वेळातच घराच्या बाहेरून मोठमोठ्यांनी ओरडण्याचा आवाज येऊ लागल्यामुळे आवाज कोणाचा येतोय हे पहाण्यासाठी त्याची आई विजयमाला व धम्मकिरण दोघेही घराबाहेर पळत आले. त्यावेळी कठाळू यांच्या अंगावर ईस्माईल व त्याचा मित्र संकेत गुप्ता मारहाण करत होते. ईस्माईलच्या हातामध्ये असलेल्या कोयत्याने तो कठाळू यांच्या डोक्यावर व तोंडावर सप्पासप वार करत होता. ज्यावेळेस त्या दोघा माय-लेकांना घराच्या बाहेर येतांना पाहिल्यावर संकेत गुप्ता हा ईस्माईलला म्हणत होता. ईस्माईल चल चल ते लोक आले आहेत. त्या दोघांनी केलेल्या मारहाणीत कठाळू हा जागीच कोसळला होता. त्या दोघा माय-लेकांना जवळ आलेले पहाताच ईस्माईल व संकेत पांढऱ्या रंगाच्या अँक्टिवा गाडीला किक मारून निघून गेले. कठाळू लहाडे यांना मुलगा धम्मकिरण व विजयमाला यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या तोंडावर, हातावर, डोक्यावर वार झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. कोयत्याने केलेल्या गंभीर वारामुळे त्यांच्या. अंगातून खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता.
याबाबत लागलीच येरवडा पोलीस स्टेशन येथे आपले वडील कठाळू लहाडे यांचा खून झाल्याची खबर समक्ष साक्षीदार धम्मकिरण लहाडे यांनी रितसर नोंदवली. मग तत्काळ येरवडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस, निरीक्षक रविंद्र शेळके हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. घटनास्थळाची बारकाईने निरीक्षण केले. तसेच कठाळू लहाडे यांचा खून होतांना त्यांचा मुलगा धम्मकिरण यांनी पाहिले असल्याने इस्माईल व संकेत गुप्ता हे दोन मारेकरी निष्पन्न झाले होते, त्यामुळे ईस्माईल व संकेत गुप्ता यांच्या शोधासाठी तपास पथकाने पी.एस.आय. स्वप्निल पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांना मदतीला घेऊन त्या दोघांचा शोध सुरू केला. तोपर्यंत त्याठिकाणी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, डी. सी.पी. विजय मगर, ए.सी.पी. विठ्ठलराव दबडे यांनी भेट देऊन या गुन्ह्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. सदरचा मृतदेह पोस्टमार्टम झाल्यानंतर धम्मकिरण यांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी रक्तमिश्रीत माती, साधी माती, तसेच काही महत्त्वपूर्ण गोष्टी जप्त करून ताब्यात घेण्यात आल्या, या परिसरातील वातावरण दुषित होऊ नये म्हणून वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी या परिसरात बंदोबस्त वाढवला होता.
कठाळू लहाडे यांच्या खुनाच्या घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा धम्मकिरण लहाडे यांनी येरवडा पोलीस स्टेशनला नोंदवल्यामुळे व फिर्यादीत ईस्माईल व संकेत गुप्ता यांचे नाव आल्याने त्या दोघांविरूध्द येरवडा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं. ३९८/२०२४ असा नोंदवून भा.दं.वि. कलम ३०२, ३४ प्रमाणे नोंदवण्यात आला. या संशयित आरोपींच्या शोधार्थ संपूर्ण येरवडा पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी स्वप्निल पाटील व त्यांचा स्टाफ अथक प्रयत्न करत होते. पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व खबऱ्यांनाही योग्य त्या सुचना दिल्या होत्या. त्यावेळी एका खबऱ्याकडून ईस्माईल शेख व संकेत गुप्ता हे संजय पार्क परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस अंमलदार अनिल शिंदे यांना मिळाली. त्या माहितीनुसार तपास पथकाचे पी.एस.आय. स्वप्निल पाटील व त्यांच्या स्टाफने याठिकाणी सापळा लावून त्या दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांना गुन्ह्याची कबुली दिली.
या गुन्ह्याचा तपास पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, या विभागाचे डी.सी.पी. विजय मगर, ए.सी. पी. विठ्ठलराव दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके हे आपले सहकारी तपास पथकाचे अधिकारी पी.एस. आय. स्वप्निल पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले यांच्या मदतीने करत आहेत.