क्राइम स्टोरी

Crime Story : जळगावच्या कारागृहात गुन्हेगारांच्या मर्जीची खात्री चाकूहल्ल्यात गुन्हेगाराच्या जीवनाला लागली कात्री

जळगाव : जळगाव उप कारागृह गेल्या काही वर्षापासून कायम चर्चेत आले आहे. या उप कारागृहातील एक ना अनेक भानगडी बाहेर येत असतात. बंदींना भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडून आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्याच्या घटना सर्वसामान्य बाब झाली आहे. कारागृहाच्या भिंती कितीही उंच केल्या तरी बाहेरुन शस्त्र, गुटखा आदी वस्तू येत असल्याचे कित्येक घटनांमधून उघड झाले आहे. उंच भिंतीवरुन बंदीवान गुन्हेगार पळून जाण्याच्या देखील घटना घडल्या आहेत. एवढेच नव्हे तर सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून मेन गेटमधून टोळीने गुन्हेगार पळून जाण्याच्या देखील घटना जळगाव उप कारागृहात घडल्या आहेत. हे उप कारागृह हाऊस फुल्ल झाल्यामुळे बंदींना ठेवण्यासाठी जागा नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे इतर कारागृहात बंदीना पाठवण्याची वेळ येत असते. काही दिवसांपुर्वी तर चक्क खूनाच्या गुन्ह्यातील बंदीवान संशयीत आरोपीचा कारागृहातच चाकूने हल्ला करुन खून झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे जळगाव उप कारागृहाच्या सुरक्षेवरच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक रवींद्र खरात यांच्या खून प्रकरणातील संशयीत आरोपीचा जळगाव उप कारागृहात बुधवार दि. 10 जुलै रोजी चाकूचे वार करत खून झाला. शेखर मोघे नावाच्या बंदीने संशयित मोहसीन खान याचा खून केला. या खूनाच्या गुन्ह्यात वापरलेला चाकू सहा दिवसांपूर्वीच कारागृहात आला होता. या घटनेनंतर कारागृह प्रशासन खळबळून जागे झाले. खून करणा-या शेखर मोघे या बंदीवानाची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक कटर देखील आढळून आले होते. त्यामुळे बंदिवानांची नियमित तपासणीच होत नसल्याची गंभीर बाब या घटनेच्या निमित्ताने पुन्हा एकवेळा समोर आली. कारागृहात अधिकाऱ्यांची नव्हे तर गुन्हेगारांची मर्जी चालत असल्याचे वेळोवेळी घडलेल्या घटनांच्या माध्यमातून उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षात हाणामारीत बंदिवानाचा मृत्यू, क्षुल्लक गोष्टीतून हाणामारी, आत्महत्येचे प्रयत्न, बंद्यांचे पलायन अशा घटना घडल्या आहेत.

भाजप नगरसेवक रविंद्र खरात यांच्यासह पाच जणांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित असलेल्या मोहसीन उर्फ राज बॉक्सर अजगर खान या बंदीवर त्याच्या बॅरेकमध्ये जावून त्याच गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या शेखर हिरालाल मोघे याने धारदार शस्त्राने वार करत त्याचा निघृण खून केला. ही घटना बुधवार दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास जिल्हा कागृहातील बॅरेक क्रमांक चार मध्ये घडली.

शेखर मोघे याला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी पॅरोल रजा मिळाली होती. मात्र मोहसीन याने तक्रारी करुन ती रजा रद्द केली होती. मोहसीनकडून शेखरला शिवीगाळसह झोपेत केस कापून टाकणे अशा प्रकारे त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळलेल्या शेखरने मोहसीनचा गेम करण्याचा प्लॅन तयार करत बाहेरुन शस्त्र मागवून घेतले होते. संधी मिळताच मोहसीनच्या मानेवर भोकसून त्याचा वचपा काढल्याची कबुली शेखरने पोलिसांना दिली.

नेहमीप्रमाणे सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास कारागृहातील सर्व बरॅक उघडण्यात आले. त्यानंतर सर्व बंदीवानांना चहा, नाश्ता देण्यात आला. त्यानंतर मोहसीन हा आपल्या बॅरेकमधील साथीदारांसोबत पुन्हा झोपून गेला. तो झोपला असल्याची संधी साधत बरॅक क्रमांक 3 मधील शेखर मोघे हा त्यांच्या बरॅकमध्ये शिरला. त्याने त्याच्याजवळील चाकूसारख्या धारदार शस्त्राने मोहसीनच्या मानेवार आणि छातीवर वार केले. या घटनेप्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शेखर मोघे याच्या विरुद्ध बीएनएस 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे नगरसेवक रविंद्र उर्फ हंप्या खरात यांच्यासह त्यांचे मोठे भाऊ व दोन मुलांवर भुसावळात अंदाधुंद गोळीबार करुन त्यांचा खून झाल्याची घटना दि. 7 ऑक्टोंबर 2019 रोजी घडली होती. या हत्याकांडामुळे संपुर्ण राज्यात खळबळ माजली होती. याप्रकरणी मोहसीन अजगर खान व त्याचा भाऊ अरबाज उर्फ गोलू अजगर खान (दोघे रा. रेल्वे फिल्टरजवळ भुसावळ), शेखर हिरालाल मोघे (रा. समता नगर भुसावळ), आकाश वासुदेव सोनवणे (रा. कवाडे नगर भुसावळ) व मयुरेश रमेश सुरवाडे (रा. आंबेडकर नगर, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून जिल्हा कारागृहातील वेगवेगळ्या बरॅकमध्ये हे बंदी आहेत. दरम्यान, बॅरेक तिन मध्ये शेखर मोघे याच्यासह आकाश सोनवणे व निलेश ठाकूर हे बंदी असून बॅरेक चार मध्ये मोहसीन खान त्याचा भाऊ अरबाज खान व मयुरेश सुरवाडे हे बंदी होते.

झोपेत असलेल्या मोहसीनवर वार झाल्यामुळे त्याच्यासोबत असलेल्यांनी आरडाओरड करत हल्लेखोर शेखर मोघे याला आवरण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारागृहातील शिपाई गणेश पाटील, समाधान सोनवणे आदींनी बॅरेकमध्ये धाव आरोपी शेखर मोघे व जखमी मोहसीन याला बाहेर काढले. जखमी मोहसीन यास तात्काळ खासगी रिक्षातून जिल्हा शासकीय रुग्णालयता दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. शेखरने मोहसीनचा गेम करण्यासाठी बाहेरुन धारदार शस्त्र मागवले होते. त्याच्या साथीदाराने काही दिवसांपुर्वी कारागृहाच्या बाहेरुन चाकू सारखे शस्त्र आत फेकले. ते शस्त्र शेखरने शौचालयाजवळ लपवून ठेवले होते. दरम्यान शेखर हा काही दिवसांपासून मोहसीनच्या हालचालींवर नजर ठेवून होता. त्याच्याकडून चाकू सारख्या धारदार शस्त्रासह कटर हस्तगत करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासुन नजर ठेवून असलेल्या शेखरने मोहसीनवर वार केल्यानंतर त्या बरॅकमधील इतर बंदीनी शेखरला दगडाने मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी शेखर मोघे याला दुसऱ्या ठिकाणी हलविल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, कारागृहाचे वरिष्ठ तुरंग अधिकारी गजानन पाटील यांच्यासह भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे व निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच दुपारच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर तुरुंग अधिकारी श्रेणी 1 एस. बी. निर्मळ यांच्यासह पाच जणांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली.

कारागृहातील कैद्यांमध्ये होणारी भांडणे जगजाहीर आहेत. अशाच प्रकारे मोहसीन व त्याचा मारेकरी शेखर मोघे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. या वादामुळे दोघांमधे तणावाचे वातावरण होते. मोहसीनने हस्तकामार्फत कारागृहात पिस्तूलची मागणी केली होती असे समजते. या जोरावर तो वारंवार इतर बंदी, पोलिस कर्मचाऱ्यांना धाक दाखवत होता. कारागृहात पिस्तूल पोहोचल्यानंतर मारून टाकेल अशा धमक्या मोहसीनने दिल्या होत्या. या कारणावरून इतरांसोबत त्याचे वैर निर्माण झाले. यातच 9 जुलै 2024 च्या रात्री दोन जणांशी त्याची झटापट झाली होती. हे भांडण आवरण्यासाठी गेलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याची वर्दी फाटली. तरीदेखील हा विषय पोलिस स्टेशनपर्यंत न जाता तो कारागृहातच संपवण्यात आला. परिणामी मोहसीनच्या हातून झालेली मारहाण, बदनामीमुळे काहींच्या हा प्रकार जिव्हारी लागला.

कारागृह प्रशासनाने वेळीच पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल केला असता तर कदाचित कारवाई होऊन संबंधित बंदी एकमेकांपासून लांब ठेवता आले असते व हा खूनाचा गुन्हा टळला असता. परंतु कारागृह प्रशासनाने त्या रात्री सजगता ठेवली नाही. आणि दुसऱ्याच दिवशी संबंधितांनी मोहसीनचा काटा काढण्याचे मनात ठेवून त्याचा खून केला.

कारागृहात गांजा, सिगारेट, दारू आधी पोहोचवणे काही अशक्य गोष्ट नाही. यापूर्वी कारागृहात पिस्तूल मागवून त्या धाकावर पाच कैदी पळून गेल्याची घटना घडली आहे. यात मोहसीनच्या मारेकऱ्याने सहा दिवसांपूर्वीच चाकू मागवून घेतला होता. त्यानंतर ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर प्रभारी तुरुंग महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी कारागृहाला भेट दिली.

जिल्हा कारागृहाची बंदी क्षमता दोनशे एवढी आहे. त्यात 184 पुरुष, 14 महिला अशी आहे. परंतु सद्यस्थितीत कारागृहात 447 पुरुष तर 17 महिला असे एकूण 464 बंदी आहेत. त्या तुलनेत नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. बंदींची संख्या लक्षात घेता शंभरच्यावर सुरक्षारक्षक, दहा अधिकारी असणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात आजमितीला फक्त 43 जणांचे मनुष्यबळ असून यात दोनच अधिकारी आहेत. रिक्त जागांची संख्या अधिक असल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. तसेच 150 बंदींना नंदुरबार कारागृहात पाठवण्यात आले आहेत. मनुष्यबळ हे कारागृह व्यवस्थापनाला कमी पडत असल्याचे दिसून येत असून याकडेही गृह विभागाने लक्ष देऊन मनुष्यबळ वाढवण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

11 सप्टेंबर 2020 रोजी तत्कालीन तुरुंग अधीक्षक पेट्रस गायकवाड यांच्या कारकीर्दीत चिन्या जगताप या बंद्याचा मारहाणीत मृत्यू झाला होता. याबाबत कोर्टाच्या आदेशानुसार पेट्रस गायकवाड यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल आहे. तसेच आणखी एका घटनेत जुना वाद उकरुन काढत बंद्यांनी जळगाव कारागृहात राडा केला होता. 25 जुलै 2020 रोजी बडतर्फ पोलिस कर्मचारी तथा बंदीवान सुशील मगरेने अन्य तीन कैद्यांच्या मदतीने कारागृहाच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाला बंदुकीचा धाक दाखवत साथीदारांसह पलायन केले होते. 26 जुलै 2023 रोजी खूनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एका बंदीवर त्याच्या बॅरेकमध्ये असलेल्या इतर बंदींनी अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली होती. या कृत्याला विरोध करणा-या बंदीच्या गळ्यावर धारदार पट्टीने वार करण्यात आले होते. 14 सप्टेंबर 2021 रोजी कारागृहातील बॅरेक क्रमांक दोन मध्ये संशयित महिलेने न्यायालयीन कोठडीत असताना साडीचा काठ चिरून त्याची दोरी करत पंख्याच्या कडीला अडकवून गळफास घेतला होता. महिला कर्मचा-यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने बंदी महिलेचा जीव वाचला.

जिल्हा कारागृहात गांजा, बीडी, सिगारेटसह दारु देखील कैद्यांपर्यंत पोहचवली जात असल्याचे अनेक प्रकार उघड झाले आहेत. घटनेच्या काही दिवसांपुर्वी कारागृहाच्या बाहेरुन एका बाटलीमध्ये माती मिश्रीत गांजा भिंतीवरुन आतमध्ये फेकण्यात आला. मात्र आवाज आल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला व तो गांजा जप्त करण्यात आला. कारागृहात धारदार शस्त्र सहजरित्या पोहचल्यामुळे कारगृह प्रशासनाच्या कारभारावर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button