लाडक्या बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा, पोलीस भरती पुढे ढकलली; उमेदवारांचे हाल
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या राज्याच्या योजनेची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दि २ शुक्रवारी सिल्लोड येथील झाली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील शुक्रवारी होणारी पोलीस भरती शहर पोलिसांनी रद्द केली. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी बाहेरगावाहून आदल्या दिवशीच मुक्कामी आल्याने दोन दिवस थांबण्याचे आणि खाण्याचे हाल होत असल्याचे सांगितले. बंदोबस्तात जास्त पोलीस गुंतल्याने भरतीसाठी कर्मचारी उपस्थित नाही, असं सांगत आजची भरती पुढे ढकलली, असं उमेदवारांनी सांगितलं. तशी नोटीस भरतीच्या ठिकाणी लावण्यात आली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने भरती पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटलं आहे. वेळेवर भरती रद्द केल्याने आलेल्या दोन हजारांवर मुलांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. बंदोबस्तात जास्त पोलीस गुंतल्याने भरती साठी कर्मचारी उपस्थित नाही म्हणून आजची भरती पुढे ढकलली.
महाराष्ट्राचे वेगवेगळ्या भागातून ही मुलं भरतीसाठी आलेत. गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना परत जाऊन येणे परवडत नाही. आज पोलीस भरती होती. मात्र मुख्यमंत्री दौरा असल्याने आजची पोलीस भरती रद्द करण्यात अली आहे. आज अडीच हजार मुलांना परत पाठवले आहे. रझाकरी सुरू आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांच्या घरचे राज्य आहे का?
अंबादास दानवे म्हणाले, पोलीस भरती रद्द केल्यानंतर मी पोलीस आयुक्तांशी बोललो. त्यांनी मनुष्यबळाच्या अभावी भरती रद्द केल्याची कबुली दिली आहे. अडीच हजार विद्यार्थी येतात त्यांचे येणे – जाणे, राहणे, खाणे, प्रवास यांचा खर्च होतो. पोलीस आयुक्तांच्या मनात आले भरती सुरू, पोलीस आयुक्तांच्या मनात आले भरती बंद ही काय रझाकारी सुरू आहे का? पोलीस आयुक्तांच्या घरचे राज्य आहे का? मला वाटते हा अडीच हजार विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
उमेदवारांचे होतायत प्रचंड हाल
पोलीस भरतीसाठी आलेला विद्यार्थी माध्यमांशी बोलताना म्हणाला की, आमची भरतीसाठी 1 ऑगस्टला आलो. जेव्हा आम्ही येथे आलो त्यावेळी नोटीस वाचल्यानंतर आम्हाला रद्द झाल्याचे कळाले.आज होणारी मैदानी चाचणी 3 ऑगस्टला होणार असल्याचे कळाले. आता दोन दिवस इथेच राहावे लागणार आहे. त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होणार आहे. स्वच्छतागृह देखील नाही. आमचे गाव 300 ते 350 किमी दूर आहे. इथे येण्यासाठी 2000 रुपये खर्च केले. गरीब आहे म्हणून भरतीसाठी आलो. एवढे पैसे खर्च करुन सतत येणे आम्हाला कसे परडवणार?