मुंबई : लोकप्रिय मराठी अभिनेत्री हिच्या नावाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतेय. धस यांनी बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना प्राजक्ताचा उल्लेल्ख केला होता. तिच्यासोबत रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावं घेत त्यांनी टीका केली होती. त्यानंतर प्राजक्ताच्या ट्रोलिंगचं प्रमाण प्रचंड वाढलंय. आता ती धस यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना लक्ष्य करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचा नवीन आणि गंभीर आरोप केला आहे. सुरेश धस यांनी यासाठी सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दाखला देत मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नावाचा उल्लेख केला होता.
सुरेश धस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, “आम्ही बघत असतो रश्मिका मंदाना, प्राजक्ता माळी, सपना चौधरी यांचे जे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यांचा जवळचा पत्ता परळी पॅटर्नकडे आहे. धनुभाऊ आपले विमान खाली आणा. तुम्हाला पालकमंत्री व्हायचे आहे. आमच लेकरू मेले त्याला न्याय द्यायचा. तुला कोणी घेरले आहे..? हा काही राजकीय विषय नाही”, असे विधान सुरेश धस यांनी केले होते. सुरेश धस यांच्या या विधानानंतर प्राजक्ता माळी याविरोधात महिला आयोगात तक्रार करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महादेव ऍप प्रकरणाचे बीड कनेक्शन असल्याचा मोठा दावा सुरेश धस यांनी केला. बीड जिल्ह्यातील गायरान जमिनी गाळे बांधण्यासाठी हडपल्याचा आरोपही धस यांनी केला. तसेच बीडमध्ये होत असलेल्या सिने अभिनेत्रींच्या कार्यक्रमांचा दखल देत त्यांनी इव्हेंट पॉलिटिक्स सुरु असल्याचे म्हटले आहे. सर्व विषयांवर बोलताना धस यांनी मात्र संपूर्ण प्रकरणामागे आकांचा हात असल्याचे आवर्जून सांगितले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार का हे पाहणे गरजेचे आहे.