
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी (२६ ऑगस्ट) सकाळच्या सुमारास अचानक कोसळला.
यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. तसेच याप्रकरणी राज्यात राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठी टीका केली आहे. हे पंतप्रधान म्हणजे जिथे हात लावून तेथे त्याची माती करणार आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, आपल्याकडे मराठीत अशी म्हण आहे की हात लावीन तिथे सोनं होतं. पण पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते. अयोध्यातील राम मंदिराला हात लावला, तिथे पाणी गळतीला सुरुवात झाली. संसदेत पाणी गळती झाली. ज्या पुलांचे उद्घाटन केले ते पूल उद्ध्वस्त होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हात लावला तो कोसळला. पंतप्रधान जिथे हात लावता ते उद्ध्वस्त होते. देश सुद्धा उद्ध्वस्त झाला आहे, असे टीका त्यांनी यावेळी केली.
तसेच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान मुघलांनीही कधी केला नव्हता. 1956 साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी प्रतापगडावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला, तिथेही हवा आहे, मात्र तो पुतळा अजूनही त्याच स्थितीत मजबूत आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर गद्दारांच्या सरकारने बांधलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. कारण तो चांगल्या मनाने नाही, तर राजकीय मनाने बांधला होता.
तुम्ही महाराष्ट्राच्या भावनांशी खेळलात, सर्वात आधी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना बरखास्त करायला हवं. त्यांनी शिवरायांनाही सोडलं नाही. सरकार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामातही लाखो कोटी रुपयांचा घोटाळा केला. आपापल्या लोकांना टेंडर आणि कामं दिली. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहिणींच्या गोष्टी करत आहेत. पण महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाविकास आघाडी यावर गांभीर्याने विचार करत आहे,” अशा शब्दात संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला.