प्रिया दत्त लढणार विधानसभेची निवडणूक; मुंबई भाजप अध्यक्षांविरुद्ध उतरणार मैदानात!
मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि माजी खासदार प्रिया दत्त यांची नुकतीच भेट झाली. ही भेट प्रिया दत्त यांच्या घरी झाली. या भेटीमुळे प्रिया दत्त विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याच्या शक्यतांना बळ मिळालं आहे. त्या भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या विरुध्द निवडणुक लढणार असल्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतात. मात्र दत्त यांनी गायकवाडांना प्रचारात मदत केली. त्यासाठी आभार मानायला आपण गेल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांना पराभवाची धूळ चारली. हा मतदारसंघ प्रिया दत्त यांनी काही काळ राखला होता. यावेळी दत्त यांनी गायकवाडांना प्रचारात मदत केली.
आशिष शेलार यांच्याविरुद्ध वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी प्रिया दत्त यांच्याशी कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र या जागेवर प्रिया चांगल्या उमेदवार ठरु शकतात, असं सूचक वक्तव्य वर्षा गायकवाड यांनी केलं. शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातून दोन वेळा आमदार आहेत.