भाजपचे मंत्री आमदार नितेश राणे यांनी केरळला ‘मिनी पाकिस्तान’ म्हटले होते. त्यांच्या विधानावर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विजयन यांनी या वक्तव्याला ‘संविधानाचा अपमान’ म्हणत ते चिथावणीखोर आणि वाद निर्माण करणारे असल्याचे ठणकावले आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी राणे यांच्यावर कडाडून टीका करत म्हटले की, “संघ परिवाराच्या विचारधारेशी सुसंगत असे हे विधान केवळ केरळविरोधी नाही, तर देशाच्या धर्मनिरपेक्षतेवरही हल्ला आहे. हा राजकीय हेतूपुरस्सर द्वेष पसरवण्याचा प्रयत्न आहे.”
विजयन यांनी राणे यांच्या विधानाला संघ परिवाराच्या राजकीय मानसिकतेचे प्रतीक ठरवले. “संघ परिवार जिथे त्यांचे वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही, तिथे अशा प्रकारचे द्वेषयुक्त प्रचार सुरू करून त्या प्रदेशाला परकं करण्याचा प्रयत्न करतो,” असे विजयन म्हणाले.
यावेळी त्यांनी राणे यांच्या राजीनाम्याची मागणी करत म्हटले की, “अशा मंत्र्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.”
काँग्रेसचा निषेध, सीपीआय(एम) वरही टीका
काँग्रेसनेही या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. एआयसीसीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले, “राणे यांनी केरळच्या धर्मनिरपेक्षतेचा अपमान केला आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री विजयन यांनी या वक्तव्यावर स्पष्ट भूमिका मांडावी. मंत्री राजीनामा देतील किंवा त्यांना अपात्र ठरवले जाईल यासाठी काँग्रेस कायदेशीर आणि राजकीय लढा उभारेल.”
मात्र, काँग्रेसने या मुद्द्याला सीपीआय(एम) च्या अलीकडील वादग्रस्त विधानांशी जोडले. वायनाडच्या लोकसभा निवडणुकीतील राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या यशामागे ‘धार्मिक मुस्लिम आघाडी’ असल्याचा आरोप सीपीआय(एम) नेत्यांनी केला होता. “सीपीआय(एम) नेच वायनाडमधील राजकारणाला धार्मिक रंग देऊन भाजपला अशा विधानांना खतपाणी घालण्याची संधी दिली आहे,” असा आरोप काँग्रेसने केला.
वायनाड धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक
वायनाड लोकसभा मतदारसंघात सुमारे ४१ टक्के मुस्लिम, ४५ टक्के हिंदू आणि १३ टक्के ख्रिश्चन मतदार आहेत. हा मतदारसंघ केरळमधील धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक मानला जातो. परंतु, या मतदारसंघाच्या राजकीय समीकरणांना धार्मिक ध्रुवीकरणाच्या छायेत ढकलण्याचा भाजप आणि सीपीआय(एम) दोघांचाही प्रयत्न असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.