रावणाने बाप म्हणून सीतेचे अपहरण केले, तसेच रावणदहनावर बंदी घालण्याची मागणी
अकोला : रावण हा एक महान राजा होता, त्यामुळं दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेचं दहन करण्यावर बंदी आणली पाहिजे. गेल्यावर्षी मी ही मागणी केली होती, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केली आहे. सीतेनं रावणाचं अपहरण केलं होतं या घटनेवर भाष्य करताना वडील म्हणून रावणानं सीतेचं अपहरण केलं होतं, असा वादग्रस्त दावाही मिटकरी यांनी केला आहे. मिटकरी यांनी विदर्भातील अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सांगोळा गावात रावणाची विधीवत पूजा केली. या ठिकाणी आदिवासी समाजाच्यावतीनं दसऱ्याच्या दिवशी रावणाची पूजा करण्याची प्रथा आहे. देशात आणखी काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते. त्यापैकी अकोला हे एक ठिकाण आहे.
मिटकरी म्हणाले, “राजा रावण हे ग्रेटच होते या ठिकाणी त्यांची जी स्मृती जपलेली आहे, तिथं अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षी येत असतो. रावणाच्या प्रतिमा तयार करुन त्याचं दहन केलं जातं. पण यावर बंदी आणावी अशी गेल्या वर्षी मी देखील मागणी केली होती. दुर्देवानं मला विधीमंडळात ते मांडता आलं नाही. रामाची पूजा करणारे लोक आहेत तसेच रावणाची पण पूजा झाली पाहिजे आणि जे रावण जाळतात त्यांचे हात तरी किमान रामासारखे पाहिजेत”
रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष असून त्याच्यातील चांगुलपणाकडं समाजाचं दुर्लक्ष होत आहे. रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षी मी रावणमंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. आता सामजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू, असा पुनरुच्चार यावेळी अमोल मिटकरी यांनी केला.
भारतात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम असतो. वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचं प्रतिक म्हणून हा कार्यक्रम केला जातो. रामायणातील संदर्भाचा या प्रथेशी संबंध आहे.