चक्क सेवानिवृत्त पीआयलाच सायबर भामट्याने घातला गंडा
छत्रपती संभाजीनगर : इंग्लंडहून तुमचे पार्सल दिल्लीत आले असून त्यात ३ लाख ५९ हजार ५०१ पाउंड आलेले आहेत. ते तुम्हाला देण्यासाठी वेगवेगळे चार्जेस लागतील, अशी बतावणी करून भामट्यांनी एका निवृत्त पोलिस निरीक्षकाकडून १ लाख २९ हजार ५०० रुपये उकळले. तसेच, अटकेची भिती दाखवून त्यांना २२ लाख रुपयांची मागणी केली. हा प्रकार २५ जून ते २१ जुलैदरम्यान घडला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्वारकादास चिखलीकर (५८, रा. अरुणोदय कॉलनी) हे फिर्यादी आहेत. ते सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक असून दत्तमंदिर, देवळाई चौक, बीड बायपास येथे असताना त्यांना एक फोन आला. त्याने इंग्लंडहून तुमचे पार्सल दिल्लीत आले असून त्या पार्सलसाठी तुम्हाला २९ हजार ५०० रुपये भरावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर चिखलीकर यांनी कोणतीही खात्री न करता त्यांच्या बँक खात्यावरून आॅनलाइन पद्धतीने २९ हजार ५०० रुपये भरले. त्यानंतर पुन्हा १ लाख रुपये मागितले असता तेही भरले. काही वेळाने पुन्हा भामट्याचा फोन आला. पार्सलमध्ये ७५ हजार पाउंड (८१ लाख रुपये) आहेत, असे सांगितले. तसेच, विश्वास बसावा म्हणून १० हजार रुपये चिखलीकर यांच्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतर पुन्हा ९९ हजार आणि २ लाख ५५४ हजार रुपये मागितले. हे पैसे पाठविले नाही तरीही भामट्यांनी पुन्हा फोन करून ७ लाख ८३ हजार ३०० रुपये मागितले.
पैसे पाठवित नसल्यामुळे भामट्यांचा वारंवार आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून फोन येत राहिला, मात्र चिखलीकर यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. शेवटी भामट्याने ७५ हजार पाउंडचे पार्सल आलेले असून त्यात खात्यात २ लाख ८४ हजार ५०१ पाउंड असल्याचे आमिष दाखविले आणि पाउंडमधून भारतीय रुपयांमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी, आरबीआयचा चार्ज, बँक खाते अपग्रेडेशन, टॅक्स आदी कारणे सांगून २५ जूनपर्यंत व्हाट्सअॅपवर मेसेज पाठवून पैसे मागत राहिला. चिखलीकर यांनी मात्र, त्याला एक रुपयाही दिला नाही. २१ जुलैला भामट्याने पुन्हा द्वारकादास चिखलीकर यांना फोन केला. डिप्लोमॅटिक अधिकारी भारतात येणार आहेत. ते तुमच्या पत्त्यावर येऊन तुम्हाला ३ कोटी ७८ लाख रुपये देणार आहेत. तुम्ही तत्काळ २२ लाख रुपये पाठवा. नाहीतर डिप्लोमॅटिक अधिकाराचा अपमान म्हणून तुम्हाला अटक करावी लागेल, अशी धमकी दिली. २२ लाख रुपये भरा अन्यथा तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस होईल. त्यातही तुम्हाला अटक केली जाईल, अशा धमक्या भामटा देत असल्याचे चिखलीकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.